जिल्हाधिकारी टीना डाबी पुन्हा प्रकाशझोतात
#जैसलमेर
राजस्थानमधील जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. डाबी यांच्या आदेशानंतर जैसलमेर येथे वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानातून आलेल्या विस्थापित हिंदूंच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील (आएएस) टीना डाबी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर डाबी यांनीही आपल्या कारवाईचे समर्थन केले आहे.
पाकिस्तानात दहशतवाद आणि अराजक माजले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे निर्वासित झाली आहेत. हेच लोक जैसलमेर भागात जिल्ह्यापासून चार किलोमीटर अंतरावर वास्तव्य करत होती. मात्र टीना डाबी यांनी दिलेल्या आदेशानंतर हे सगळेच रस्त्यावर आले आहेत. या कुटुंबांची घरे बुलडोझर चालवून उडवण्यात आल्यानंतर या सगळ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. जेव्हा कारवाई करायला लोक आले होते तेव्हा महिलांनी कडाडून विरोध केला. मात्र कुणाचेही न ऐकता ही घरे जमीनदोस्त करण्यात आली. सध्याच्या घडीला कडक उन्हात बसायची वेळ या सगळ्यांवर आली आहे. अनेक महिलांनी आपले घर डोळ्यांदेखत जमीनदोस्त केले गेल्याने टाहो फोडला आहे. डाबी यांच्या आदेशानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी जोधपूर येथे देखील पाकिस्तानतील अत्याचारामुळे विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदूंच्या घरावर देखील असेच बुलडोझर चालवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेकडून डाबी यांच्यावर टीका केली जात आहे.
टीना डाबी ट्वीटरवर ट्रेंड
या कारवाईनंतर देशभरातील नेटकरी ट्विटरवर टीना डाबी यांच्याबद्दलच सर्च करत होते. २०१५ साली आएएस टॉपर राहिलेल्या टीना डाबी सध्या जैसलमेर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पहिला विवाह, घटस्फोट आणि दुसरा विवाह हे सोशल मीडियावर चर्चेचे विषय बनले होते. आता अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे त्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत. वृत्तसंस्था