Gazette notification for Census 2027 issued...
नवी दिल्ली | साल २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेची आणि पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या जातनिहाय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध झाली. दरम्यान, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल (१५ जून) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह सचिव, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त ( RG&CCI) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आगामी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर जनगणना करण्याची अधिसूचना आज (१६ जून २०२५) अधिकृत राजपत्रात प्रसिध्द झाली.
जनगणना दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात गृह सूचीकरण आणि गणनामध्ये प्रत्येक घराची स्थिती, मालमत्ता व सुविधा यांची नोंद घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणनामध्ये प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसांख्यिक,सामाजिक- आर्थिक, सांस्कृतिक व इतर माहिती संकलित केली जाणार आहे.
या जनगणने दरम्यान जातीगणनाही केली जाईल. या कामासाठी सुमारे 34 लाख प्रगणक व पर्यवेक्षक आणि सुमारे १.३ लाख जनगणना पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. ही जनगणना १६ वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. ही जनगणना मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. माहिती संकलन, प्रेषण आणि साठवणुकीच्या वेळी डेटा सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत.
देशभरात ३४ लाख प्रगणक आणि निरीक्षक, एक लाख तीन हजारांहून जास्त अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. देशातल्या बर्फाळ प्रदेशात एक ऑक्टोबर २०२६ पासून, तर इतर भागात एक मार्च २०२७ पासून जनगणना सुरू होणार आहे.