प्रचार संपला, आता लक्ष १३ मे कडे
#बंगळुरू
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होत असून त्यासाठीच्या प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी संपली. सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधी काँग्रेस पक्षाने सारी ताकद लावून प्रचार केला आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून मतमोजणी १३ मे रोजी होणार असून मतदार कोणाला कौल देतात त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अडचणीत आलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या भाजप सरकारची नौका वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या बरोबरीने दोन नंबरचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, लिंगायत नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आदींनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली,
कर्नाटकची निवडणूक मुख्यतः स्थानिक प्रश्नांभोवती फिरत असल्याचे दिसत होते. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या प्रचाराची धुरा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी या केंद्रातील नेत्यांसमवेत प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या आदी नेत्यांवर होती. या निवडणुकीतील किंगमेकर पक्ष ठरण्याची शक्यता असलेल्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाची प्रचाराची धुरा पक्षाध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर होती.
काँग्रेसकडून सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज विजयनगर भागात प्रचार सभा घेतल्या, तसेच रॅलीमध्येही भाग घेतला. सोनिया गांधी या प्रचारात फार दिसल्या नाहीत. त्यांनी रविवारी प्रचार सभेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी बंगळुरूमधील कनिंगहॅम भागातील कॅफे कॉफी डे मध्ये कॉफी घेत नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर महापालिका परिवहनच्या मुख्य स्थानकावर कॉलेज विद्यार्थी, कामकरी महिलांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्याबरोबर सेल्फीही काढून घेतली. प्रत्येकाला नमस्ते करत त्यांनी विद्यार्थ्यांना कोठे जात आहात अशी विचारणा केली. यावर त्यांनी कॉलेजला असे उत्तर दिल्यावर काही काळ गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी बसमधून प्रवास करत सामान्य महिला, नागरिकांशी संवाद साधला. त्यांना कोणत्या प्रश्नांला सामोरे जावे लागते अशी विचारणा केल्यावर बहुतेकांनी वाहतूक, महागाई समस्येचा प्रश्न मांडला. लिंगराजपूरम स्थानकावर राहुल गांधी खाली उतरले. त्यांनी राज्याच्या अनेक भागात प्रचार सभा, रॅली घेतल्या आहेत.
दरम्यान, कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कर्नाटकच्या जनतेला स्थैर्य आणि विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेत त्या म्हणाल्या की, भाजपचे लोक धोकादायक असून कर्नाटकच्या जनतेने त्यांना अजिबात मतदान करू नये. मणिपूरमधील स्थितीची पाहणी करण्यासाठी एकही प्रतिनिधी पाठवला नसल्याबद्दल त्यांनी केंद्रातील सरकारवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, मणिपूरमधील स्थितीबाबत आपणाला चिंता वाटत असून तेथे पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्यावर कितीजण मेले याचा खरा आणि नेमका आकडा कळत नाही. राज्य सरकार कोणतीही माहिती देत नाही. तेथील हिंसाचार हा मानवनिर्मित आहे.