ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची काँग्रेसची मागणी

महिला कुस्ती खेळाडूंनी केलेल्या लैंगिक शोषण आरोपप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात केवळ एफआयआर दाखल करणे पुरेसे नाही. या प्रकरणी त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी शनिवारी काँग्रेस पक्षाने केली. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि दिल्ली पोलीस ब्रिजभूषण शरण सिंग यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:15 pm
ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची काँग्रेसची मागणी

ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची काँग्रेसची मागणी

#नवी दिल्ली

महिला कुस्ती खेळाडूंनी केलेल्या लैंगिक शोषण आरोपप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात केवळ  एफआयआर दाखल करणे पुरेसे नाही. या प्रकरणी त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी शनिवारी काँग्रेस पक्षाने केली. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि दिल्ली पोलीस ब्रिजभूषण शरण सिंग यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.  

दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध केवळ एफआयआर दाखल करणे पुरेसे नाही. ब्रिजभूषण हे चौकशी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न नक्की करणार. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे. देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवणारे खेळाडू एवढे गंभीर आरोप करत असताना आणि एफआयआर दाखल झाल्यानंतरही सरकार त्यांना मोकळे कसे सोडते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढेच नव्हे तर ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेखाली ४० गुन्हे दाखल झालेले आहेत. यावरून त्यांची पार्श्वभूमी स्पष्ट होते. 

ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दोन एफआयआर दाखल केले. भारतातील प्रसिद्ध महिला कुस्तीगीरांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून झाल्यावर चार महिने उलटले तरी कोणतीही कारवाई झाली नव्हती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर एफआयआर दाखल केले. 

याबाबत हुडा म्हणाले की, खेळाडूंनी तीन महिन्यांपूर्वी जंतर-मंतरवर निदर्शने केल्यानंतर दिल्ली पोलिसांना कारवाई करण्यास एवढा विलंब का झाला? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केल्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या बाबतीत दिल्ली पोलीस नि:पक्ष नाहीत हेच यावरून सिद्ध होते. आरोपी खासदार आपल्या पक्षाचा असल्याने भारतीय जनता पक्ष त्यांना पाठीशी घालत आहे ही बाब लपून राहिलेली नाही.  

दरम्यान, ब्रिजभूषण यांनी  कुस्तीपटू आपल्याविरोधात कारस्थान रचत असल्याचे म्हटले आहे. याला उत्तर देताना कुस्तीपटू विनेश फोगटने म्हटले आहे की, मी केवळ चार वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले नाही. गेली १४ वर्षे मी  राष्ट्रीय स्पर्धा खेळले असून पुन्हाही खेळणार आहे. बजरंग आणि इतर खेळाडू देखील चाचणी देऊनच गेले आहेत. कोणताच खेळाडू देशापेक्षा मोठा नाही. राष्ट्रीय स्पर्धेचे नियम बदलण्याच्या चर्चा निराधार आहेत. दरम्यान, बजरंग पुनियाने प्रश्न उपस्थित केला आहे की, तक्रार देणारी खेळाडू अल्पवयीन आहे, हे  ब्रिजभूषणला कसे कळले?

तो म्हणतो की, आम्ही घटनात्मक पदावर असलेल्या प्रत्येकाचा आदर करतो. आम्ही असे काहीही बोलत नाहीत, ज्यामुळे कुणाच्या प्रतिमेला धक्का बसेल. पण मग आमचाही मानसन्मान आहे. त्यामुळे समितीतील गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते, याविषयी खुलासा व्हायला हवा. आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंचे आरोप राजकीय असल्याचे सांगून भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी राजीनामा देणे ही आपल्यासाठी मोठी गोष्ट नसल्याचे म्हटले आहे. मात्र गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest