संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: रस्त्यावरुन एखादा बुलडोझर पाहिला तर कोणत्या तरी भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी जात असेल असाच विचार येतो. देशभरात बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर अॅक्शन घेतली जाते. मात्र गुजरातमध्ये बुलडोझर अॅक्शनचा असा प्रकार समोर आला आहे जो पाहून कोणीही हैराण होईल. गुजरातमधील एका कुटुंबाने सूड उगवण्यासाठी बुलडोझर भाड्याने घेतल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.
उत्तर प्रदेशातून दोष सिद्ध होण्यापूर्वीच आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतर राज्यांमध्येही हीच प्रथा सुरू झाली असताना आता व्यक्तिगत कारणामुळे बुलडोझरचा वापर केला जात असल्याने चिंता वाढली आहे. गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एक विवाहित महिला आपला प्रियकर महेश फुलमालीसोबत पळून गेली. महिला घरातून पळून गेल्यानंतर संतापलेल्या कुटुंबाने त्या मुलाचे घर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय गेतला. मग काय महिलेच्या कुटुंबाने बुलडोझर भाड्याने घेऊन महेश फुलमाली आणि त्याच्या सहा नातेवाईकांच्या घराचा काही भाग उद्ध्वस्त केला.
फुलमालीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून बुलडोझर जप्त केले आहे. महेश फुलमालीची आई आनंद जिल्ह्याच्या अंकलाव तालुक्यात आपल्या आई-वडिलांना भेटायला गेली होती. त्यापूर्वीच फुलमाली त्याच्या विवाहित प्रेयसीसोबत पळून गेला होता. फुलमालीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि त्याचे नातेवाईक त्यांच्या घरी आले आणि कुटुंबाला धमकी दिली. त्यांनी महेशच्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिली आणि त्याच्या बहिणीला कानशिलात लगावली.
सगळीकडे बुलडोझरची चर्चा
उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची प्रथा सुरू आहे. अनेक राज्यांमध्येही अशी पद्धत सुरू झाल्याचे दिसते. कोणत्याही प्रकरणात दोषी सिद्ध होण्यापूर्वीच आरोपींचे घर उद्ध्वस्त केले जाते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यभरातील गुन्हेगारांच्या 'बेकायदेशीर' मालमत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात आहे. त्यातच आता भरूच जिल्ह्यातील एका कुटुंबाने व्यक्तिगत वैमनस्यातून घेतलेला मार्ग हा चिंतेचा विषय बनला आहे.