बसपाचे खासदार अफजल अन्सारी यांचे लोकसभा सदस्यत्व जाणार
#नवी दिल्ली
बहुजन समाज पार्टीचे खासदार अफजल अन्सारी यांना अपहरण आणि खून प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्याने त्यांचे संसद सदस्यत्व आता रद्द होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णानंद राय यांच्या अपहरण आणि खून प्रकरणात न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावताना एक लाखाचा दंडही ठोठावला आहे. याच प्रकरणात अफजल यांचे गुन्हेगार राजकारणी भाऊ मुख्तार अन्सारी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
गाझीपूर येथील न्यायालयाने हा निकाल देताना अफजल यांना चार वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होणार हे नक्की झाले आहे. भारतीय लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास आणि दोषी ठरल्यास संबंधिताचे लोकसभा सदस्यत्व रद्द होते. केरळमधील वायनाडमधून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, उत्तर प्रदेशातील रामपूरचे आमदार आझम खान, त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम, भाजपचे मुझफ्फरनगरचे खासदार विक्रम सैनी यांना याच तरतुदीनुसार आपले सदस्यत्व गमवावे लागले आहे.
मुख्तार अन्सारी यांना दोषी ठरवताना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. हे २००७ मधील प्रकरण असून अन्सारी गेली १५ वर्षे तुरुंगात आहेत. तसेच त्यांच्यावर ६० पेक्षा अधिक खटले दाखल झालेले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करत अन्सारी बंधूंनी २००७ मध्ये बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता.
वृत्तसंस्था