तंबीनंतर अखेर ब्रिजभूषण नरमले
#नवी दिल्ली
महिला कुस्तीगिरांचे आंदोलन अधिक तीव्र होत असताना अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तंबी दिली आहे. यामुळे अखेर ब्रिजभूषण नरमले असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना कुस्तीपटूंच्या बाबतीत अनावश्यक वक्तव्य टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार ५ जून रोजी होणारी प्रस्तावित रॅलीही त्यांनी रद्द केली आहे. केंद्रातील नेत्यांनीच त्यांना रॅली रद्द करण्यास बजावले होते.
महिला कुस्तीगीर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध महिन्यापेक्षा अधिक काळ जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. खेळाडूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. केंद्र सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून त्यांनी नव्या संसद भवनाच्या दिवशी महापंचायत आयोजित केली होती. हा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला आणि जंतर-मंतरवरील आंदोलनाचे तंबू आणि अन्य साहित्य उखडून टाकले होते.
याला उत्तर देताना ब्रिजभूषण शरण सिंह यांनी ५ जून रोजी अयोध्येत जनजागृती रॅली काढण्याची घोषणा केली होती. रॅलीमध्ये ११ लाख लोक त्यांच्या समर्थनार्थ येतील असा दावा केला होता, मात्र शुक्रवारी (२ जून) त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे रॅली रद्द करण्याची घोषणा केली.
ब्रिजभूषण फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, माझ्या शुभचिंतकांनो! तुमच्या पाठिंब्याने मी गेली २८ वर्षे लोकसभेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना सर्व जाती, समाज आणि धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्या पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत काही राजकीय पक्ष ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रांतवाद आणि जातीय संघर्ष वाढवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण समाजात पसरलेल्या वाइट गोष्टींवर विचारमंथन करण्यासाठी ५ जून रोजी अयोध्येत संत संमेलन घेण्याचे ठरले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचा आदर करत 'जन चेतना, महारॅली, ५ जून, अयोध्या चलो' कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पोस्टच्या शेवटी ब्रिजभूषण समर्थकांचे आभार व्यक्त करत त्यांचे कुटुंब नेहमीच ऋणी राहील, असे म्हटले आहे.
ब्रिजभूषण यांची रॅली रद्द करण्याची घोषणा खाप पंचायती कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरल्यानंतर करण्यात आली आहे. ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध दोन एफआयआर असून त्यातील एक अल्पवयीन कुस्तीपटूंच्या आरोपांवर आधारित आहे. हे आरोप व्हायरल झाल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेते सक्रिय झाले आणि त्यांनी रॅली रद्द करण्यास सांगितले. आरोपपत्रात म्हटले आहे की, ब्रिजभूषण यांनी अनेकदा विनयभंग केला. शरीराला अयोग्यरित्या स्पर्श केला. श्वास तपासण्याच्या नावाखाली टी-शर्ट काढले. अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्यावर शारीरिक संबंधाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी कुस्तीपटूंच्या पोटाला हात लावल्याचा आरोप केला आहे. जखमी महिला खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. खेळाडूंनी यास नकार दिला असता त्यांनी चाचणीमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला. महिला खेळाडू खोलीतून बाहेर पडत तेव्हा ब्रिजभूषण यांच्याशी संंबध येऊ नये यासाठी त्या समूहाने फिरत. एका महिला कुस्तीपटूने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेवेळी एका हॉटेलमध्ये जेवताना तिला स्पर्श केला. या कृत्याने आपल्याला धक्का बसला. पुढचे काही दिवस आपले स्वास्थ्य पूर्णपणे हरवले गेले. पीएमओमध्ये झालेल्या बैठकीतही त्याने वारंवार लैंगिक, भावनिक, शारीरिक, शारीरिक भाष्य केले.