चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकून दिले
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळा २०२५ सुरू आहे. या कुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याची सूत्रांनी दिली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी महाकुंभ मेळाव्याबाबत मोठं विधान केले असून या विधानावरून आता वादंग निर्माण झाले आहे.
महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदीत फेकले, असा दावा जया बच्चन यांनी केला. तसेच महाकुंभच्या नियोजनावरूनही बच्चन यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारबाबत संताप व्यक्त केला. महाकुंभ मेळ्याच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी ज्या भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. ज्यामुळे ते पाणी प्रदूषित झाले. आजही विचाराल की सर्वाधिक दूषित पाणी कुठे तर ते महाकुंभ मेळ्यात आहे. कारण त्या ठिकाणी कुठलीही स्वच्छता केली जात नाही, असेही बच्चन म्हणाल्या. जया बच्चन यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.
जया बच्चन नेमके काय म्हणाल्या?
मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. हे पाणी लोकांपर्यंत तसेच पोहोचते आहे. तसेच लोकांचे लक्ष या घटनेकडून विचलित व्हावं म्हणून काळजी घेण्यात आली. मृतदेहांचे शवविच्छेदन होऊ दिले नाही. ज्या भाविकांचा मृत्यू झाला ते मृतदेह थेट पाण्यात फेकण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली जात नाही, अशी टीका जया बच्चन यांनी केली.
२९ जानेवारीला काय घडले?
महाकुंभ मेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. २९ जानेवारीला मध्यरात्री १ च्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. या दरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रयागराजमध्ये १३ जानेवारी २०२५ पासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि 'अदृश्य सरस्वती' नदीच्या संगमावर येत आहेत.
त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा - सोनू निगम
संसदेबाहेर केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगमने जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर जया यांचा व्हीडीओ शेअर करत सोनूने चक्क त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. ‘जया बच्चन यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभजी (त्यांचे पती), त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. या व्हीडीओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. जया बच्चन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी काहींनी केली आहे.
सनसनाटी विधाने करण्याची सवय
त्यांच्या या वक्तव्याचा विश्व हिंदू परिषदेने समाचार घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेने जया बच्चन यांच्या अटकेची मागणी केली आहे. जया बच्चन यांचे हे वक्तव्य दुर्दैवी असून अस्थिरता निर्माण करणारे आहे. तशा त्या नेहमीच वादग्रस्त बोलून सनसनाटी निर्माण करत असतात. लक्ष वेधण्यासाठी त्यांना हे करण्याची गरज भासत असावी. मात्र उच्च पदावर बसलेल्या खासदाराचे हे वक्तव्य देशात अस्थिरता निर्माण करणारे आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे माध्यम प्रभारी शरद शर्मा म्हणाले. खोटे बोलून सनसनाटी निर्माण करणाऱ्या जया बच्चन यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. महाकुंभ म्हणजे आस्था आणि भक्ती. तिथे धर्म, कर्म आणि मोक्षाची प्राप्ती होते. कोट्यवधी भाविकांच्या भावना या महान अनुष्ठानशी जोडलेल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.