‘फोड भाई फोड’, तू एटीएम फोड
#भोपाळ
एका कंपनीच्या २०० एटीएम मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत देशातील १८ राज्यांमध्ये ही चोरी करण्यात आली. यातून चोरट्यांनी एकूण २.५३ कोटी रुपये काढून नेले आहेत. ही चोरी यापूर्वीच झाली होती, मात्र आता हे प्रकरण उघडकीस आले आहे. ८७२ एटीएम कार्डचा वापर करून २,७४३ ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून हे पैसे लुटले असल्याची माहिती कंपनीने दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही चोरी गेल्या वर्षी १२ ते १४ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये झाली होती. कंपनीच्या गोरेगाव कार्यालयात याबाबत कळवण्यात आले होते. कंपनीने आपल्या टीमकडून याबाबत तपास केला. त्यानंतर २० डिसेंबरला वानराई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरांची ट्रिक काय होती, याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. एक व्यक्ती एटीएम मशीनमध्ये डेबिट कार्ड इन्सर्ट करून ट्रान्झॅक्शन सुरू करायचा. पैसे मशीनच्या शटरजवळ येताच, दुसरी व्यक्ती एटीएम मशीनच्या मागून इलेक्ट्रिक वायर किंवा लॅन केबल काढून टाकायची. यानंतर पहिली व्यक्ती शटरमध्ये अडकलेले पैसे ओढून घ्यायचा, असे फिर्यादीत म्हटले आहे. वायर काढून टाकल्यामुळे हे ट्रॅन्झॅक्शन पूर्ण झाल्याचे न दाखवता 'फेल्ड' असे दाखवायचे. यामुळे डेबिट कार्डच्या बँक अकाउंटवर पैसे परत क्रेडिट व्हायचे. मात्र मशीनमधून पैसे गेल्यामुळे कंपनीला याचा भुर्दंड बसायचा, अशी माहिती समोर आली आहे.
तीन दिवसात १८ राज्यांत धुमाकूळ
विशेष बाब ही होती की, अवघ्या तीन दिवसांमध्ये छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, आसाम, हिमाचल, पंजाब आणि इतर १० राज्यांमध्ये अशा प्रकारची चोरी करण्यात आली. याची एकूण रक्कम २.५३ कोटी रुपयांहून अधिक होती. कंपनीने आपल्या सर्व एटीएम मशीन्समध्ये असणारी हार्ड डिस्क तपासल्यानंतर ही माहिती समोर आली. या गुन्हेगारांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेही निकामी केले होते. मात्र, मशीनमध्ये असलेल्या पिनहोल कॅमेऱ्यांमध्ये त्यांचे चेहरे दिसून येत आहेत. हे फोटो पोलिसांकडे जमा करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. गुन्हेगारांनी जे डेबिट कार्ड वापरले, ते बनावट बँक खाती तयार करून मिळवले असण्याची शक्यता मध्य प्रदेशातील भोपाळ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे गोपीनाथ यांनी व्यक्त केली.
वृत्तसंस्था