भाजपला एकाही मुस्लीम मताची गरज नाही
#शिवमोग्गा
राजकीय पक्षांच्या प्रचारामुळे कर्नाटकातील वातावरण चांगलेच तापत आहे. काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) अशी तिरंगी लढत होत असली तरीही भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचीच चर्चा रंगत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी शिवमोग्गा येथे 'भाजपला एकाही मुस्लीम मताची गरज नसल्याचे' विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवमोग्गा येथे भाजपतर्फे आयोजित विरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना ईश्वरप्पा म्हणाले की, इथे विजयासाठी भाजपला एकाही मुस्लीम मताची गरज नाही. तरीही भाजप मुस्लीम समाजाच्या उत्थापनासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मुस्लीम भाजपला मतदान करतात, असे सांगत ईश्वरप्पा यांनी सारवासारव केली आहे. कर्नाटकात विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
यावेळी कर्नाटकात काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर भाजप नेते पुन्हा सत्तेच्या चाव्या पक्षाकडे सोपवल्या जातील, असा विश्वास व्यक्त करत आहेत. भाजपच्या कारभाराला कंटाळलेले मतदार भाजपला सत्ता देणार नाहीत, या विश्वासाने माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्रिपदासाठी आस लावून बसलेले डी. के. शिवकुमार यांनी पक्षाला किती जागा मिळतील, याचा आकडाही जाहीर केला आहे, तर दुसरीकडे कडव्या हिंदुत्वाच्या मुद्यावर कर्नाटकची सत्ता राखता येईल, असा विश्वास बसवराज बोम्मई आणि येदियुरप्पा यांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर ईश्वरप्पा यांचे हे विधान विरोधकांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. ईश्वरप्पा यांच्यासोबत या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा हे देखील उपस्थित होते.
दरम्यान ईश्वरप्पा यांच्या या विधानावर लोकांनी प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे. ईश्वरप्पांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन करून विजयाची हमी मागितली होती. अर्थात त्यांच्या विधानाने जसा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे तशीच हिंदू मते एकवटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
वृत्तसंस्था