बिपरजॉय आज संध्याकाळी जाखाऊ बंदरावर धडकणार
#गांधीनगर
सर्वाधिक तीव्रता असणारे चक्रीवादळ बिपरजॉय गुरुवार, १५ जून रोजी सांयकाळी कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकेल, अशी शक्यता आहे. जाखाऊ बंदर गुजरातमधील अरबी समुद्रात असून तेथे वादळाच्या काळात ताशी १५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
सध्या गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडत असून जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुजरात सरकारने कच्छ-सौराष्ट्रातील किनाऱ्यापासून १० किमी अंतरावरील ७ जिल्ह्यांतील ३८ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढून निवारागृहात ठेवले आहे.
परंपरेनुसार, सोमनाथच्या द्वारकाधीश मंदिराच्या मुख्य शिखरावर दिवसाला ५ वेळा ध्वज बदलला जातो. मात्र मंगळवारपासून येथे ध्वज बदललेला नाही. त्याच्या खाली दोन ध्वज फडकवले आहेत. स्थानिक लोकांच्या मतांनुासर दोन ध्वज एकत्र फडकवण्यामागे एक श्रद्धा असून त्यामुळे अनर्थ टळतो, असे लोक मानतात. आता १७ जूनपर्यंत मुख्य शिखरावर नवीन ध्वज लावण्यात येणार नाही असे मंदिर प्रशासनाने सांगितले. मंदिराच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे. मंदिराच्या शिखराची उंची १५० फूट आहे.
गेल्या २५ वर्षांतील जून महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीवर थडकणारे बिपरजॉय हे पहिले वादळ असेल. यापूर्वी ९ जून १९९८ रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर वादळ आले होते. त्यावेळी पोरबंदरजवळ १६६ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते.
गेल्या५८ वर्षांचा विचार केला तर १९६५ ते २०२२ दरम्यान अरबी समुद्रात १३ चक्रीवादळे आली. यातील दोन गुजरातच्या किनारपट्टीवर धडकली तर एक महाराष्ट्र, एक पाकिस्तान, तीन ओमान-येमेनमध्ये आली. तसेच सहा वादळे समुद्रावरच विरली. बुधवारी सकाळी हे वादळ द्वारकापासून २९० किमी आणि जाखाऊ बंदरापासून २८० किमी अंतरावर होते.