भाजपकडून कर्नाटकच्या जनतेचा विश्वासघात
#बंगळुरू
राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने जनतेचा विश्वासघात केला असून आपले यश झाकण्यासाठी मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वडेरा यांनी रविवारी केला. भाजपने जनतेचा सर्व पातळ्यांवर विश्वासघात केला आहे. बेरोजगारी, विकास कामाची अपुरी आश्वासने हे जनतेसमोरील मुख्य प्रश्न असून त्यापासून लक्ष वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.
विधानसभेसाठी काँग्रेसने कोणते प्रश्न हाती घेतल्याची माहिती देऊन त्या पुढे म्हणाल्या की, जनतेचे प्रश्न सोडविण्याची काँग्रेसची भूमिका असून त्यापासून लक्ष विचलित करण्याचा आमचा प्रयत्न नसेल. भाजपने कर्नाटकच्या जनतेला लुटले आहे, याची त्यांनाही जाणीव आहे. राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याची क्षमता असलेल्या नेत्याची निवड करण्यासाठी ही निवडणूक आहे. काँग्रेसने नेहमी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस नेहमी काम करत असते. खोटी आश्वासने देऊन भ्रष्ट मार्गाने सत्ता प्राप्त केलेल्या भाजपने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जनतेसाठी काम करण्याचे काँग्रेसचे ध्येय असून आजपर्यंत कधीही पक्षाने जनतेचा विश्वासघात केलेला नाही.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची कामे तुम्ही पाहिली असल्याचे मतदारांना स्मरण करून देत प्रियांका म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करतो याचा जनतेने अनुभव घेतला आहे. गेल्या विधानसभेवेळी जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, दगाबाजी, विश्वासघाताच्या मार्गाने भाजपने सत्ता काबीज केली.
चित्रदुर्ग येथे पक्षाच्या उमेदवारासाठी झालेल्या रोड शो मध्येही प्रियांका गांधी यांनी भाग घेतला. रोड शो मध्ये भाग घेताना त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. तसेच जनतेने आपल्या सन्मानासाठी आणि भवितव्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपच्या भ्रष्ट कारभारावर टीका करताना त्या म्हणाल्या की, पोलीस भरतीमध्ये भाजपने भ्रष्टाचार केला असून नोकरभरतीसाठी पैसा खाणारे सरकार जनतेने खाली खेचण्याची हीच वेळ आहे. ४० टक्के कमिशन कोणाला द्यावे लागते हे जनतेला पूर्ण माहीत आहे. कंत्राटदारांना त्रास देणारे, नोकर भरतीत पैसा खाणारे, भ्रष्ट कारभाराची परंपरा चालवणारे हे सरकार आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे.
वृत्तसंस्था