कुस्तीगीर संगीता फोगाट ब्रिजभूषण यांच्या घरी
#नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातील घटनांची संगती लावण्यासाठी दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीगीर संगीता फोगाटसह ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या घराला भेट दिली. शुक्रवारी दुपारी दीड वाजता महिला हवालदारासह संगीता फोगाटने घराला भेट दिली. ते तेथे अर्धा तास होते असे पोलिसांनी सांगितले. लैंगिक शोषणाची घटना कशी झाली आणि तिला शोषणाला कोठे आणि कसे सामोरे जावे लागले याचा तपशील पोलिसांनी घटनास्थळी समजून घेतला.
दरम्यान, तडजोड करण्यासाठी कुस्तीगीर ब्रिजभूषणच्या घरी गेल्याचे वृत्त खोटे असल्याचे विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवून ब्रिजभूषण आमचे आंदोलन कमजोर करण्याचे प्रयत्न करत असून त्याला अटक झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. त्याच्या अटकेची आमची मागणी कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या दोन तक्रारी दाखल झाल्या असून याबाबतचा चौकशी अहवाल पोलीस पुढील आठवड्यात न्यायालयाला सादर करणार आहेत. चौकशीचा भाग म्हणून आतापर्यंत पोलिसांनी १८० लोकांचे जबाब घेतले आहेत. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीगिरांच्या बैठकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिनाअखेर आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी १५ जूनपर्यंत आपले आंदोलन थांंबवले आहे.
दरम्यान विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक या कुस्तीगिरांनी कोणतेही द्वेषमूलक भाषण केले नाही. तसेच कोणताही दखलपात्र गुन्हा केलेला नाही, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या कृती अहवालात म्हटले आहे. या कुस्तीगिरांविरोधात दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टात बम बम महाराज यांनी याचिका दाखल केली. विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटूंनी बदनामी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिजभूषण सिंह यांच्यावर खोटे आरोप केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी प्रथमच अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, सर्व मुद्दे न्यायालयासमोर आहेत. १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. आरोपपत्र दाखल करू द्या. मला आता काही बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणे योग्य असेल तर बोलेन. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी शिबिरात निवडीसाठी दुर्लक्ष केल्यामुळे बदला घेण्यासाठी पोस्को तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. यावर ब्रिजभूषण म्हणाले की, आता हे न्यायालयाचे काम आहे. याविषयी मी काही बोलणार नाही.
दरम्यान, आंदोलक आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातील बैठकीचा तपशील आता समोर येत आहे. या बैठकीसाठी पोषक वातावरण उत्तर प्रदेशातील भाजपच्या दोन प्रमुख खासदारांनी तयार केले होते. दोन्ही खासदार जाट समाजाचे आहेत. तसेच आंदोलन करणारे बहुतेक पैलवान जाट आहेत.
४ जूनच्या रात्री झालेल्या भेटीनंतर पैलवानांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहेत. ब्रिजभूषण सिंह गप्प आहेत आणि आतापर्यंत ब्रिजभूषण यांच्या पाठीशी राहिलेल्या भाजपची भूमिका बदलताना दिसत आहे. या सर्व गोष्टींची तयारी शाह-आंदोलकांच्या बैठकीतच झाली होती.
वृत्तसंस्था