आसामच्या ‘लेडी सिंघम’ जुनमोनी राभा यांचा अपघातात मृत्यू
#दिसपूर
आसामध्ये ‘लेडी सिंघम’ अशी ख्याती असणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१६ मे) पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची कार एका कंटेनरला धडकली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. जुनमोनी राभा असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. अपघाताच्या वेळी कारमध्ये त्या एकट्याच होत्या. शिवाय त्यांनी आपला पोलीस गणवेशही परिधान केला नव्हता.
हा अपघात नागाव जिल्ह्याच्या जाखलाबंधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडला. मृत महिला पोलीस अधिकारी जुनमोनी राभा या ‘लेडी सिंघम’ किंवा ‘दबंग कॉप’ या नावाने ओळखल्या जायच्या. जेव्हा अपघात घडला तेव्हा त्यांच्याबरोबर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, शिवाय त्यांनी पोलिसांचा गणवेशही परिधान केला नव्हता. त्या एकट्याच कारने अप्पर आसामच्या दिशेने जात होत्या. पहाटे अडीचच्या सुमारास सूचना मिळाल्यानंतर, पोलिसांच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जुनमोनी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती जाखलाबंधा पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कलिता यांनी दिली आहे. जुनमोनी राभा या मोरीकोलॉन्ग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणाऱ्या अधिकारी अशी त्यांची ओळख होती. शिवाय एका आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाल्यानंतरही त्या चर्चेत आल्या होत्या.