उत्तर प्रदेशात आणखी एक गुन्हेगार यमसदनी
#मेरठ
उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी आणखी एक चकमक झाली असून यात कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना ठार झाला आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मेरठ येथे ही कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेश एसटीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल दुजानावर २५ गुन्हे दाखल होते. यामध्ये १८ गुन्हे हत्येचे होते. दंगल, दरोडा, लूटमार आणि खंडणीसारखेही गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड अनिल दुजाना एसटीएफच्या मेरठ युनिटसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्यावर अनेक खटले होते. तो कॉन्ट्रॅक्ट किलर होता. त्याच्यावर १८ खुनाचे खटले होते. पुढील तपास सुरू असल्याचे अमिताभ यश म्हणाले आहेत.
अनिल दुजानाचे मूळ नाव अनिल सिंग असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील दुजाना गावातील असल्याने त्याची ओळखही तीच बनली. दोन भाऊ, बहिणीसह त्याच्या कुटुंबात पाचजण आहेत. ५.५ लाख रुपयांची चोरी करून त्याने २००२ साली एकाची हत्या केली होती. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. अखेर गुरुवारी झालेल्या चकमकीत तो मारला गेला. दरम्यान गेल्या महिन्यातही उत्तर प्रदेशात चकमक झाली होती. या चकमकीत कुख्यात गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद अहमद मारला गेला. उमेश पाल प्रकरणात तो पोलिसांच्या रडारवर होता. असद चकमकीत ठार झाल्यानंतर दोनच दिवसांनी अतिक आणि त्याचा भाऊ असदची मारेकऱ्यांनी हत्या केली.