अमृतपालसिंग अखेर गुरुद्वारात शरण
#नवी दिल्ली
विघटनवादी खलिस्तानी आणि भिंद्रनवाले समर्थक अमृतपाल सिंग याला अखेर अटक केली आहे. १८ मार्चपासून पोलिसांना हुलकावणी देणारा अमृतपालसिंग अखेर मोगा जिल्ह्यात रोडे येथे पोलिसांना शरण आला. त्याला अटक केल्यानंतर त्याची कडेकोट बंदोबस्तात आसामच्या दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
अमृतपालच्या अटकेला पंजाब पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तसेच राज्यातील जनतेला शांतता पाळण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. कोणतीही बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी खातरजमा करा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक सुखचैनसिंग गिल म्हणाले की, २९ वर्षीय अमृतपाल सिंग रोडे खेड्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही तेथे पोलीस तैनात केले होते. चारही बाजूने घेरल्यामुळे त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी नव्हती. त्यामुळे अखेर तो रोडे येथील गुरुद्वारात पोलिसांना शरण आला.
अमृतपाल सिंग हा कट्टर धार्मिक नेता असून त्याच्या अटकेची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत. त्याने पारंपरिक पांढरा वेष घातलेला आहे. अमृतपाल सिंगला आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंदोबस्तात हलवले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक केलेले त्याचे आठ साथीदार तेथेच ठेवलेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक झाली तर कोणत्याही आरोपाशिवाय वर्षभर कैदेत ठेवता येते.
अमृतपाल सिंग खलिस्तानी आणि पाकिस्तानी एजंट असल्याचा केंद्राचा आरोप आहे. गेले काही वर्ष तो पंजाबमध्ये सक्रिय असून तो नेहमी सशस्त्र साथीदारांसमवेत फिरत असतो. भिंद्रनवाले २.० अशी समर्थकांमध्ये त्याची ओळख आहे. विघटनवादी खलिस्तानी चळवळीचा समर्थक आणि दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा अनुयायी असल्याचे अमृतपाल सिंग सांगत असतो.
अंजनाला पोलीस ठाण्यावर अमृतपालचे समर्थक चाल करून गेल्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आणि पंजाब दे वारिस या संघटनेच्या समर्थकांविरुद्ध १८ मार्चला कारवाई करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याच्याविरुद्ध पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एकत्रित कारवाई सुरू केली होती. मान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अमृतपालच्या अटकेबाबत २ मार्च रोजी चर्चा केली होती. या एकत्रित प्रयत्नांचे फळ म्हणजे अमृतपालसिंगची शरणागती असे म्हणता येईल.
वृत्तसंस्था