बाराशे महिलांच्या घेरावानंतर पकडलेल्या १२ जणांना सोडले
#इंफाळ
राज्यातील बाराशे महिलांनी घेराव घातल्यावर सुरक्षा दलांनी शनिवारी बंदी घातलेल्या कांगलेई यावोल कन्ना लुप संघटनेच्या १२ कार्यकर्त्यांना सोडावे लागले. एवढेच नाही तर त्यांच्या दबावामुळे सध्या सुरू असलेली शोधमोहीमही सुरक्षा दलांनी बंद केली आहे. मणिपूरमध्ये ५३ दिवसांपासून हिंसाचार आणि निदर्शने सुरू आहेत. बाराशे महिलांनी केलेल्या घेरावानंतर सुरक्षा दलासमोर अवघड स्थिती निर्माण झाली होती.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळ पूर्वेकडील इथम गावात गुप्तचर माहितीनंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली होती. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. सुरक्षा दलांनी येथून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
या गावात जवळपास डझनभर केवायकेएल कार्यकर्ते लपून बसले होते. यामध्ये स्वयंभू लेफ्टनंट कर्नल मोइरांगथेम तांबा ऊर्फ उत्तम यांचा समावेश होता. KYKL हा मैतई समुदायाचा समूह आहे. नुकत्याच झालेल्या हिंसाचारात अनेक ठिकाणी या गटाचे नाव पुढे आले आहे. डोगराच्या ६ व्या बटालियनवर २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यामागे उत्तम हा मास्टरमाईंड होता..
गावातील महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे १२०० ते १५०० लोक पुढे आले. सुरक्षा दलांनी अनेक वेळा गर्दी न करण्याचे आवाहन केले. त्याचा काही उपयोग झाला नाही. लष्कराने जमावावर कारवाई केली असती तर लोकांचे नुकसान झाले असते. त्यामुळे सैन्याने केवायकेएल कार्यकर्त्यांना गावकऱ्यांच्या स्वाधीन केले आणि फक्त जप्त केलेली शस्त्रे आणि दारूगोळा शिल्लक आपल्याकडे ठेवला
मणिपूरमध्ये आतापर्यंत वांशिक हिंसाचारात १५० लोकांचा मृत्यू झाला आहे.तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीत शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी ४० आयपीएस अधिकारी आणि ३६ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २० वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.
मणिपूरमध्ये ५३ दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. ही बैठक ३ तास चालली. बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. पक्षाने मणिपूरबाबत आपल्या ८ मागण्या ठेवल्या आहेत. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर मौन सोडावे आणि राज्याचे मुख्यमंत्री त्वरित बदलावे, अशी मागणी पक्षाने केली आहे.
वृत्तसंस्था