समलिंगी विवाहाच्या मान्यतेने मानवाच्या अस्तित्वाला धोका
#नवी दिल्ली
समलिंगी विवाहाला मान्यता देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाला उद्देशून हिंदू धर्म आचार्य या हिंदू संघटनेने एक पत्र पाठवले असून त्यात समलिंगी विवाहाला मान्यता दिल्यास मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली आहे.
हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष आणि प्रमुख हिंदू नेते स्वामी अवधेशानंद याबाबत ट्विटरवर म्हणतात की, भारत हा काही केवळ १४६ कोटी लोकांचा देश नाही. भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा सनातन वैदिक परंपरा, धार्मिक, संस्कृती आणि मानवी संवेदनशीलतेचा आहे. या संस्कृतीमध्ये विवाह ही अत्यंत पवित्र रिती-रिवाज असून त्यात एक पुरुष आणि महिला एकत्र येऊन कुटुंब संकल्पनेची स्थापना करतात. त्यातूनच कुटुंब संकल्पनेची वाढ, कौटुंबिक मुल्याचे रक्षण आणि सामाजिक जबाबदारी निर्माण होते. हे पत्र अवधेशानंद यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
समलिंगी विवाहाला मान्यता दिली तर ते मानवाच्या अस्तित्वावर घाव घातला जाईल असे स्पष्ट करून अवधेशानंद म्हणतात की, वैदिक विश्वासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समलिंगी विवाहामुळे संपतील. समाज विकासाच्या विविध प्रथा आणि सांस्कृतिक परंपराच्या आधारे आज आपल्या देशाची रचना बनलेली आहे. समलिंगी विवाहाला मान्यता दिल्यास भारतासारख्या देशात सामाजिक दृष्ट्या अनागोंदी माजेल.
समलिंगी विवाहासारख्या अनैसर्गिक विचारामुळे देशातील धर्माचार्य, संतमंडळींना धक्का बसल्याचे स्पष्ट करून ते म्हणतात की, समलिंगी विवाहासारख्या अनैतिक आणि अयोग्य संकल्पना बारतीय समाजाला पूर्णपणे अमान्य आहेत.
वृत्तसंस्था