संग्रहित छायाचित्र
पंजाबच्या लुधियाना पश्चिमचे आमदार आणि आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत बस्सी गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (१० जानेवारी) रात्री एक कार्यक्रमावरून गोगी घरी आले. त्यानंतर एका खोलीत बसून ते जेवण करत होते. त्यांच्या खोलीतून बंदूकीचा आवाज आला. त्यांच्या पत्नी डॉ. सुखचन कौर गोगी यांनी तिथे जावून बघितले असता गोगी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या महितीनुसार, गोगी यांना गोळी लागलेल्या पिस्तुलाचा त्यांच्याकडे परवाना होता. मात्र त्यांना गोळी कशी लागली याची माहिती अद्याप समोर समोर आली नाही. गोगी यांना गोळी लागताच त्यांना दयानंद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जतानाच प्रशासनाला त्याबद्दल माहिती दिली होती. रुग्णालयात जाईपर्यंत डॉक्टरांची टीम सज्ज होती. त्यांनी ताबडतोब गोगी यांच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील गोळी देखील काढली. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लुधियानाचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला.