आदिवासी शेतकऱ्याने उभारले ४०० एकराचे जंगल

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील ७४ वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने निसर्ग संवर्धनाचा समुदायकेंद्रित दृष्टिकोन बाळगत आपल्या गावातील ४०० एकर जमिनीचे घनदाट जंगलात रुपांतर केले आहे. दामोदर कश्यप असे या शेतकऱ्याचे नाव असून वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 8 Jun 2023
  • 07:44 am
आदिवासी शेतकऱ्याने उभारले ४०० एकराचे जंगल

आदिवासी शेतकऱ्याने उभारले ४०० एकराचे जंगल

‘ग्रीन वॉरियर’च्या कृतीमुळे संपूर्ण गावाला प्रेरणा; छत्तीसगड सरकारने घेतली दखल

#जगदलपूर

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील ७४ वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने निसर्ग संवर्धनाचा समुदायकेंद्रित दृष्टिकोन बाळगत आपल्या गावातील ४०० एकर जमिनीचे घनदाट जंगलात रुपांतर केले आहे. दामोदर कश्यप असे या शेतकऱ्याचे नाव असून वनखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कश्यप यांच्या प्रयत्नांमुळे केवळ त्यांच्या संघ करमरी या गावातच वनीकरण होण्यात मदत झाली नाही तर आसपासच्या गावांनाही यातून प्रेरणा मिळाली आहे. कश्यप यांनी आपल्या आदिवासी समुदायाला सहभागी करून घेत काही दशकांच्या प्रयत्नांनंतर या जंगलाची निर्मिती केली आहे.

 कश्यप म्हणाले, की १९७० मध्ये बारावीनंतर मी जगदालपूरवरून माझ्या गावी परतलो. यावेळी, घराजवळच असलेल्या ३०० एकरवरील जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहून मला धक्का बसला. एकेकाळी हिरवेगार असलेल्या या जंगलात केवळ काही वृक्षच उरले होते.  त्यामुळे अस्वस्थ होऊन जंगलाचे पुनरुज्जीवन करून गाव हरित करण्याचा निश्चय केला. मात्र, गावकरी उदरनिर्वाह किंवा दैनंदिन जीवनासाठी वृक्षतोड करत होते. त्यामुळे, सुरुवातीला गावकऱ्यांना वृक्षतोडीपासून परावृत्त करणे खूप कठीण होते. मात्र, हळूहळू त्यांना जंगलाचे महत्त्व समजू लागले, असेही त्यांनी नमूद केले.

कश्यप यांचा मुलगा तिलकरामनने सांगितले, की कश्यप यांची १९७७ मध्ये गावच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जंगलाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वृक्षतोड थांबविण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यासह जंगलाचे नुकसान करणाऱ्यांना दंडही ठोठावला. आमच्या घराजवळील ३०० एकर जंगलाव्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मदतीने दरवर्षी वृक्षारोपण करून माओलीकोट परिसरातही १०० एकर जंगल विकसित करण्यात आले.प्रतिकूल परिस्थितीत समुदाय एकतेसाठी महत्त्वपूर्ण व चिरस्थायी बदल घडविल्याबद्दल कश्यप यांना पौल के फेयरबेंड पुरस्कारानेही गौरविण्यात आले. एवढेच नव्हे, तर वनसंवर्धनातील अमूल्य योगदानाबद्दल छत्तीसगड राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता नववीच्या पुस्तकातही त्यांच्यावरील धड्याचा समावेश केला आहे. सध्या माझे वडील विविध प्रजातीच्या वृक्षांसाठी १० एकर जमिनीवर रोपवाटिका उभारत आहेत, असेही त्याने नमूद केले. कश्यप यांच्या प्रयत्नांमुळे आपले गाव हिरवेगार झाल्याबद्दल व कडक उन्हाळ्यातही वातावरण थंड राहत असल्याबद्दल गावकरी कृतज्ञ आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest