सग्रहीत छायाचित्र
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे देशभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून सर्वजण पूर्वीपासूनच गंभीर आजारांनी ग्रस्त होते.
सध्या देशात एकूण ४,०२६ सक्रिय कोविड-१९ रुग्ण आहेत. राज्यनिहाय पाहता केरळमध्ये सर्वाधिक १,४१६ रुग्ण असून त्याखालोखाल महाराष्ट्रात ४९४, गुजरातमध्ये ३९७, दिल्लीत ३९३, पश्चिम बंगालमध्ये ३७२, कर्नाटकमध्ये ३११, तामिळनाडूमध्ये २१५ तर उत्तर प्रदेशात १३८ सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यू झालेल्यांची माहिती:
केरळमध्ये ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्णाला गंभीर न्यूमोनिया, तीव्र श्वसन त्रास (ARDS), मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार होते. तामिळनाडूमध्ये टाइप २ डायबेटीस आणि पार्किन्सन आजाराने त्रस्त असलेल्या ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ४३ वर्षीय महिलेला तीव्र कोरोनरी सिंड्रोम, सेप्टिक शॉक आणि मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या होती.
महाराष्ट्रात दोन मृत्यू, मुंबईत रुग्णसंख्या वाढतेय:
महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून ते दोघेही आधीपासूनच गंभीर आजारांनी ग्रस्त होते. यासह राज्यात यावर्षी कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० झाली आहे. सोमवारी राज्यात ५९ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी २० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८७३ असून त्यापैकी ४८३ रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोविड रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
नवीन प्रकारामुळे वाढते संक्रमण, सौम्य लक्षणे:
कोरोनाच्या NB.1.8.1 या उप-प्रकारामुळे सध्या रुग्णवाढ होत असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिली आहे. हा ओमिक्रॉन प्रकाराचा उपप्रकार असून तो जलदगतीने पसरतो. मात्र त्यामुळे सौम्य स्वरूपाचा आजार होतो.
सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी, शरीरदुखी, नाक वाहणे आणि भूक मंदावणे यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू हंगामी फ्लूसारखाच आहे, मात्र विशेषत: आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे.
-धोका वाढतोय पण चिंता करू नका- सौम्या स्वामिनाथन
दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनने (डब्लूएचओ) माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी आता करोनाबाबत आणि त्याच्या व्हेरिएंटबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, सध्या करोनाचा धोका वाढतो आहे ही बाब खरी आहे. मात्र चिंतेची आवश्यकता नाही. २०२० मध्ये जशी स्थिती आली होती तशी परिस्थिती आता येणार नाही. एका मुलाखतीत सौम्या स्वामिनाथन यांनी हे भाष्य केले आहे. कोविड, सार्स-कोव्ही २ हे विषाणूचे व्हेरिएंट आहेत. मात्र हा विषाणूचा व्हेरिएंट आता तसा सामान्य आहे. करोनाचा विषाणू म्युटेट होत असतो म्हणजेच त्यात सातत्याने बदल होतो आहे. आता करोना व्हायरला पाच वर्षे झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही, असे सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.