संग्रहित छायाचित्र
धर्मांतर करून सनातन धर्माचा स्वीकार केलेल्या जितेंद्र त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. इस्लामचा त्याग करून सनातन धर्म स्वीकारणाऱ्या लोकांना घरवापसी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. इतकचं नाही तर सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहिन्याला ३ हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी आले असता जितेंद्र त्यागी यांनी ही घोषणा केली.
कोण आहेत जितेंद्र त्यागी?
जितेंद्र त्यागी हे पूर्वीचे वसीम रिझवी होते. उत्तरप्रदेशात शिया वक्फ बोर्डाचे ते माजी अध्यक्ष होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी इस्लामचा त्याग केला. धर्मांतर करून त्यांनी सनातन धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी आपले वसीम रिझवी हे नाव बदलून जितेंद्र त्यागी हे नाव धारण केले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांना वसीम रिझवी हे नवं नाव दिलं होतं.
काय म्हणाले जितेंद्र त्यागी?
प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात स्नान केल्यावर ते जितेंद्र त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) हे बोलत होते. त्यागी म्हणाले, आज प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मी स्नान केलं. मला खूप आनंद झाला. मी या पवित्र भूमीवरून संपूर्ण देशातल्या मुस्लिमांना आवाहन करतो की, त्यांनी सनातन धर्मात पुन्हा येण्याचा (घरवापसी) विचार करावा. मी माझ्या मित्रांच्या मदतीने एक संघटन तयार करत आहे. आमच्या या संघटनाच्या माध्यमातून जे मुस्लिम कुटुंब सनातन धर्मात घरवापसी करतील त्यांना आम्ही दर महिना ३ हजार रुपये देऊ. जो पर्यंत ते कुटुंब पूर्णत: सनातन धर्मात स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाईल. तसेच ज्या लोकांची व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना त्यासाठी मदत केली जाईल. परंतु त्यासाठी तुम्हाला कट्टरपंथी मानसिकतेतून बाहेर यावं लागेल. तुम्हाला जिहादी मानसिकतेतून बाहेर यावं लागेल. तुमच्या मर्जीने सनातन धर्मात घरवापसी करा. सनातन धर्म तुमचं स्वागत करेल, असं जितेंद्र त्यागी म्हणाले.