‘महिने २२०, भ्रष्टाचार प्रकरणे २२५’
#जबलपूर
मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या शिवराज सिंह चौहान सरकारने २२० महिन्यात २२५ भ्रष्टाचाराची प्रकरणे करून विक्रम केल्याची घणाघाती टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी येथील जाहीर सभेत केली. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला प्रियांका गांधी यांनी या जाहीर सभेद्वारे प्रारंभ केला. केवळ भ्रष्टाचारात गुंतलेल्या शिवराज सिंह चौहान सरकारला रोजगार देण्यात अपयश आल्याचा दावा करून व्यापम आणि रेशन धान्य वितरणाच्या घोटाळ्याचा त्यांनी भाषणात विशेष उल्लेख केला.
गेल्या तीन वर्षात राज्य सरकारने केवळ २१ रोजगार दिल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या की, ही बाब माझ्या नजरेस आणली तेव्हा आपणाला आश्चर्य वाटले. त्यामुळे माझ्या कार्यालयाने याची तीन वेळा खातरजमा केली. यामध्ये ही बाब खरी असल्याचे आढळले. चौहान सरकारने भ्रष्टाचारात देवालाही सोडले नसल्याचा जोरदार टोला त्यांनी हाणला. २८ मे रोजी आलेल्या जोरदार वाऱ्याने उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉरमधील सहा भव्य मूर्ती कोसळल्या होत्या. विशेष म्हणजे याचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.
पुनर्रचना केलेल्या महाकालेश्वर मंदिरातील ९०० मीटरच्या कॉरिडॉरसाठी ८५६ कोटींची तरतूद असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठी ३५१ कोटी खर्च केले होते. डबल इंजिनच्या भाजपच्या दाव्याची खिल्ली उडविताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, डबल इंजिनच्या दाव्याला हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकने जोरदार उत्तर दिले असून आता तुमची पाळी आहे. तुम्हीही आता त्यांना तसेच उत्तर द्या. विकासासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे यासाठी भाजप डबल इंजिन या कल्पनेची मांडणी करत असतो.
जबलपूरमध्ये आलेल्या प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी लावलेली ३० फुटांची गदा आकर्षण आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी बजरंग बलीचा मुद्दा वापरण्यात आला. दुसरीकडे, मध्य प्रदेशात बजरंग बलीच्या मदतीने काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील आदि शंकराचार्य चौकात बजरंग बलीची ३० फूट उंचीची गदा लावण्यात आली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे अध्यक्ष के के मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शहरात हनुमानाची ३०-३० फुटांची गदा बसवण्यात आली आहे. ते न्यायाच्या विजयाचे प्रतीक आहेत. माजी अर्थमंत्री आणि आमदार तरुण भानोत म्हणाले की, भाजपने भगवान श्रीरामाच्या नावाचा गैरवापर केला आहे. भगवान हनुमान हे श्री रामाचे मोठे भक्त आहेत. त्यांची गदा ज्या पद्धतीने कर्नाटकात चालली आहे, तीच मध्य प्रदेशातही चालेल.
कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या बजरंग दलावर बंदीच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बजरंग बलीच्या नावाने मते मागितली होती. भाजप नेत्यांनी बजरंग दलावरील बंदीचा संबंध बजरंग बलीच्या अपमानाशी जोडला. जबलपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोडही केली. त्यामुळे जबलपूरमध्ये बजरंगबली आणि गदा यांचे महत्त्व अधिकच वाढते
काँग्रेस कमलनाथ यांना हनुमानाचे भक्त असल्याचे सांगत आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नकुल नाथ यांची छायाचित्रेही आदि शंकराचार्य चौकात लावण्यात आली आहेत. के के मिश्रा म्हणतात की, काँग्रेस पक्ष कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवेल. प्रियांका गांधी-वढेरा सकाळी डुमना विमानतळावर आल्या तेव्हा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष दक्षता म्हणून प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेसाठी २०० अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. काँग्रेसच्या निवडणूक कोअर टीमने ३०० हून अधिक व्हीडीओ बनवले आहेत, जे भगवान श्री राम, महाभारत आणि सनातन धर्माने प्रेरित आहेत. ते लवकरच सोशल मीडियावर प्रसिद्धी होतील. जबलपूरनंतर रीवा, बुंदेलखंड (सागर) आणि ग्वाल्हेरमध्येही प्रियांका यांचे कार्यक्रम आहेत. राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेत उज्जैन-इंदूरमधून गेले होते. त्यामुळेच त्यांचेही कार्यक्रम या भागात होऊ शकतात.
वृत्तसंस्था