संग्रहित छायाचित्र
अभिनेत्री प्रीती अत्यंत आलिशान आयुष्य जगते. ती लवकरच ‘लाहोर १९४७’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रीतीच्या ‘पंजाब किंग्ज’ या क्रिकेट टीमने ‘आयपीएल २०२५’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ती आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरभक्कम कमाई करते. यंदाच्या सिझनमध्ये प्रीतीच्या टीमने सुरुवातीपासूनच दमदार कमाई केली आहे. आयपीएलच्या क्वॉलिफायर २ राउंडमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. आता अंतिम सामना हा पंजाब किंग्जविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा रंगणार आहे. यादरम्यान पंजाब किंग्जची सहमालक प्रीती झिंटा तिच्या टीममधून किती पैसे कमावते, ती एकूण संपत्ती किती आहे ते पाहुयात..
माध्यमातील माहितीनुसार, प्रीतीची एकूण संपत्ती १८३ कोटी रुपयांच्या घरात आहे. ती बिझनेस आणि ब्रँड एंडोर्समेंट यातून कमावते. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती १.५ कोटी रुपये घेते.२००८ मध्ये प्रीती आयपीएल टीम पंजाब किंग्जची सहमालक बनली. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, तिने त्यावेळी ३५ कोटी रुपये गुंतवले होते, जे आता ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. २००८ मध्ये जेव्हा पंजाब किंग्जची सुरुवात झाली, तेव्हा ते ७६ दशलक्ष डॉलर्सना विकत घेण्यात आलं होतं. २०२२ पर्यंत त्याचं मूल्य ९२५ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढलं होतं.
आयपीएलमधील तिकिट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात आयपीएल टीमच्या मालकांचाही वाटा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रीचा ८० टक्के भाग संघ मालकांच्या खात्यात जातो. इतकंच नव्हे तर टीम प्रायोजकत्वाद्वारेही पैसे कमावले जातात.
प्रीतीची विविध ठिकाणी संपत्ती आहे. हाऊसिंग डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मुंबईत पाली हिल्स परिसरात तिचं १७.०१ कोटी रुपयांचा अपार्टमेंट आहे. याशिवाय शिमल्यातही तिचं एक घर आहे. त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये इतकी आहे. लग्नानंतर प्रिती लॉस एंजेलिसला राहायला गेली. तिथे ती पती जीन गुडइनफ आणि दोन मुलांसोबत राहते. बेव्हरली हिल्समध्ये त्यांचं एक मोठं घर आहे. प्रितीला आलिशान गाड्यांचाही शौक आहे. तिच्याकडे बारा लाख रुपयांची लेक्सस एलएक्स ४०० क्रॉसओव्हर आहे. याशिवाय तिच्याकडे पोर्शे, मर्सिडीज बेंझ ई क्लास (५८ लाख रुपये) आणि बीएमडब्ल्यूदेखील आहेत.