संग्रहित छायाचित्र
सोनू म्हणाला, ‘‘माझी तुम्हाला विनंती आहे की, जर तुम्हाला जायचे असेल तर येऊ नका. शोच्या आधी निघून जा. मला माहित आहे की तुम्ही लोक महान आहात. तुम्ही खूप मोठी जबाबदारी सांभाळत आहात. शोमध्ये बसून आपला वेळ वाया घालवू नये. तुम्ही आधीच निघून जावे.’’
सोमवारी (दि. ९) ‘रायझिंग राजस्थान ग्लोबल समिट’अंतर्गत जयपूरच्या रामबाग हॉटेलमध्ये सोनू निगमचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कार्यक्रमाच्या मध्येच निघून गेल्याचे बोलले जात आहे. ते बाहेर पडल्यानंतर उर्वरित मंत्री आणि इतर प्रतिनिधीही निघून गेले. भजनलाल शर्मा यांच्या या वृत्तीवर सोनूने राजकारण्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारी रात्री उशिरा सोनू निगमने सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर करून एका कलाकाराची व्यथा मांडली.
अलीकडेच मी रायझिंग राजस्थान कार्यक्रमांतर्गत जयपूरमध्ये एक कॉन्सर्ट केला आहे. इथे खूप छान कार्यक्रम झाला. त्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. देश आणि जगाच्या विविध भागांतील प्रतिनिधी येथे उपस्थित होते. राजस्थानची शान वाढवण्यासाठी या लोकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, क्रीडामंत्री यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. अंधारामुळे मला फारसे लोक दिसत नव्हते. कार्यक्रमाच्या मध्यभागी मी पाहिले की मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री उठून निघून गेले. ते निघताच सर्व प्रतिनिधीही निघून गेले. माझी सर्व राजकारण्यांना विनंती आहे की जर तुम्ही तुमच्या कलाकारांचा आदर करणार नाही तर बाहेरचे लोक काय करणार? तेही काय विचार करत असतील? मी अनेक देशांमध्ये मैफिली केल्या आहेत. असे काही तिथे दिसले नाही. माझी विनंती आहे की तुम्हाला जायचे असेल तर येऊ नका. शो सुरू होण्यापूर्वी निघून जा. परफॉर्मन्सच्या मध्येच उठून निघून जाणे हे कोणत्याही कलाकाराचा अनादर आहे. हा सरस्वतीचा अपमान आहे, असे सोनूने सुनावले.
सोनू पुढे म्हणाला, ‘‘मुख्यमंत्री आणि मंत्री निघून गेले तेव्हा मला अनेक लोकांकडून संदेश आले की तू असे शो करू नकोस. राजकारण्यांसाठी परफॉर्म करू नको. कारण ते असे उठून निघून गेले तर कलेचे कौतुक कुठे होणार? माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला जायचेच असेल तर परफॉर्मन्सच्या आधी जा. तुम्ही बसू नका.’’
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दिया कुमारी, उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड, मुख्य सचिव सुधांश पंत आणि मंत्री परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी देश-विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.