संग्रहित छायाचित्र
मराठी नाट्यक्षेत्रातून एक धक्कादायक बातमी आहे, रंगभूमीवर विशेष सक्रिय असणाऱ्या एका तरुण अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेता सुबोध वाळणकर असे या अभिनेत्याचे नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने त्याला जीव गमवावा लागला. सुबोधच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जातो आहे. अलीकडेच एका मानाच्या एकांकिका स्पर्धेत सुबोधच्या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी अभिनेत्याचे निधन झाले.
अभिनेते-दिग्दर्शक आणि सांस्कृतिक कलादर्पणचे चंद्रशेखर सांडवे यांनी सुबोधविषयीचे हे वृत्त शेअर केले आहे. सांस्कृतिक कलादर्पणच्या फेसबुक पेजवरही या घटनेविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '२१७ पद्मिनी धाम या नाटकातील तरुण तडफदार अभिनेता तसेच यंदाच्या सवाई विजेत्या "चिनाब से रावी तक" या एकांकिकामधील अभिनेत्याचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कै. अभिनेता सुबोध सुरेश वाळणकर यास भावपूर्ण श्रद्धांजली'. ३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली, मात्र या विषयीचा अधिक तपशील समोर आलेला नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वी २५ जानेवारी रोजी पार पडलेल्या 'सवाई एकांकिका स्पर्धा २०२४' मध्ये सर्वोत्कृष्ट सवाई एकांकिकेचा मान डोंबिवलीच्या क्राऊड नाट्यसंस्था आणि स्टोरिया प्रॉडक्शन या संस्थेच्या 'चिनाब से रावी तक' या एकांकिकेला मिळाला. यामध्ये सुबोधने महत्त्वाची भूमिका साकारली होती. गुलजार यांच्या 'रावीपार' या कथेवर आधारित असलेली ही एकांकिका फाळणीदरम्यान चिनाबवरून निघालेल्या एका ट्रेनमधील विवाहित जोडप्यावर बेतलेली आहे. याशिवाय त्याने '२१७ पद्मिनी धाम', 'बॉम्बे १७' या नाटकांमध्ये काम केले आहे. सुबोधच्या निधनानंतर कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जाते आहे.