संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्सनी एन्ट्री घेतली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मात्र अभिनयाच्या वाटेने न जाता थेट दिग्दर्शनात पदार्पण करतोय!रोमान्सचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून काय कमाल दाखवेल, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. नेटफ्लिक्सच्या भव्य इव्हेंटमध्ये जेव्हा शाहरुख स्टेजवर आला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये जल्लोष सुरू झाला आणि मग, नेहमीच्या आपल्या अंदाजात त्याने घोषणा केली "माझ्या मुलाने दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकलेय!" शाहरुखच्या या घोषणेने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.
नेटफ्लिक्सने मुंबईत आयोजित केलेल्या ‘नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स’ या कार्यक्रमात आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात शाहरुख अचानक पोहोचला आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लाँच इव्हेंटमध्ये शाहरुखने सांगितले की, आर्यन आपली दिग्दर्शनाची इनिंग सुरू करत आहे. त्याने आपल्या पहिल्या प्रोजेक्टचे नाव जाहीर केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमध्ये शाहरुखने हे शीर्षक कसे उच्चारावे हेही सांगितले.
आर्यनच्या या वेब सीरिजविषयी गेल्या काही महिन्यांपासून अनेक अंदाज लावले जात होते. अखेर, या इव्हेंटमध्ये त्याच्या पहिल्या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही बॉलिवूडच्या दुनियेतील एका बाहेरच्या माणसाच्या संघर्षावर आधारित आहे. ही एक सहा एपिसोड्सची सीरिज असून, यात सलमान खान, रणबीर कपूर, बादशाह आणि बॉबी देओल यांचे कॅमिओ रोल असणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खानही यात झळकण्याची शक्यता आहे. इव्हेंटमध्ये या सीरिजचा पहिला टीझर सादर करण्यात आला. आर्यनने मागील वर्षी मे महिन्यात या सीरिजचं शूटिंग पूर्ण केले होते. आता त्याच्या रीलिजची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी शाहरुखने आपल्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला "मी जितकं प्रेम प्रेक्षकांकडून मिळवलं, त्याचं निम्मे जरी माझ्या मुलांना मिळाले, तरी ते खूप आहे." यानंतर शाहरुखने सांगितले की, त्याने या सीरिजचे काही एपिसोड्स पाहिले आहेत आणि त्याला त्यातील कंटेंट खूप आवडला. आर्यन नेहमीच कॅमेऱ्यापासून दूर राहिला आहे. अभिनयापेक्षा दिग्दर्शन आणि लेखनात रस असलेल्या आर्यनने आपल्या पहिल्याच वेब सीरिजमधून एक वेगळी कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही वेब सीरिज २०२५ च्या पहिल्या तिमाहीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चाहत्यांना आता याची रीलिज डेट कधी जाहीर होईल याची प्रतीक्षा आहे.