बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळं अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच, एका पत्रकार परिषदेत बोलताना सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेत्यानं भावुक वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेत आलं आहे.
सलमान खान याचा 'सिकंदर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशना निमित्त मुंबई येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तो बोलत होता. यावेळी त्याने माध्यमांशी दिलखुलास गप्पा मारल्या.
पत्रकार परिषदेदरम्यान, सलमानला लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून देण्यात येणाऱ्या धमक्यांबद्दल विचारले असता 'अल्लाह है, भगवान है, सब उन पर हैं... नियतीने माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहलं आहे, तेवढं आहे.' असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे.
नेमकं काय म्हणाला सलमान खान?
'अल्लाह है, भगवान है, सब उन पर हैं... नियतीने माझ्या नशिबात जेवढं आयुष्य लिहलं आहे, तेवढं आहे. बस इतकचं. कधी कधी इतक्या साऱ्या लोकांना सोबत घेऊन चालताना अडचणी निर्माण होतात, असे सलमान खान याने म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीत 1998 साली काळवीटाच्या हत्येवरुन वाद सुरु आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मध्यंतरी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबारही करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानाबाहेरच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली होती.
याचदरम्यान, वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध असणारे राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्येही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात होता. तेव्हापासून सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती. सलमान खानच्या सुरक्षेच्या कारणामुळे सिकंदर चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच सोहळाही रद्द करण्यात आला होता.
धमकीचे मेसेज, धमकीचे ई-मेल, पत्र आणि गोळीबार अशा अनेक घटना घडल्या. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणी सलमान खानचं घर आणि पनवेलच्या फार्महाऊसची रेकीही केली होती. याशिवाय, सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा कट होता, असेही आरोपींनी कबूल केले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याबद्दल लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.