Oscars 2025 : 'अनोरा'चे सर्वोच्च यश, पहिल्यांदाच मानांकने मिळविणाऱ्या अनेक चित्रपटांची सोहळ्यात सरशी.....

९७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा २०२५ : सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार....

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 4 Mar 2025
  • 07:34 pm
Oscars 2025 news,

Oscars 2025

 

लॉस एंजेलिस : प्रथमच नामांकन मिळालेला अत्यंत कमी खर्चात तयार झालेल्या ‘अनोरा’ने सर्व महत्त्वाच्या ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, संकलन आणि सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. यंदाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच मानांकने मिळविणाऱ्या अनेक चित्रपटांची सरशी झाल्याचे दिसले.

मायकी मॅडिसन यांना ‘अनोरा’साठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर एड्रियन ब्रॉडी यांना ‘ब्रुटलिस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ब्राझीलचा ‘आय ॲम स्टिल हिअर’ सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट ठरला. या गटात देखील फ्रान्स-जर्मनीमधून दाखल झालेल्या ‘एमिलीया पॅरेझ’ चित्रपटाला पुरस्कार मिळविता आला नाही.

गेल्या काही वर्षांत बड्या स्टुडिओजच्या अगडबंब खर्च झालेल्या नेत्रदीपक सिनेमांपेक्षा ‘इंडिपेण्डण्ट’ चित्रपटांचे वजन ऑस्करमध्ये वाढत आहे. यंदाही तेच चित्र दिसले. ‘अनोरा’ या चित्रपटासाठी शॉन बेकर यांच्या नावावर नवा इतिहास नोंदला गेला. एकाच व्यक्तीच्या नावाने एकाच सोहळ्यात सर्वाधिक चार पुरस्कार मिळविणाऱ्या वॉल्ट डिझ्ने यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी साधली. २००४ सालापासून समाजासाठी निषिद्ध आणि दुर्लक्षित विषयांवर चित्रपट बनविणाऱ्या बेकर यांच्या या चित्रपटाने सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर बाजी मारली.

चित्रपटगृहात इतर प्रेक्षकांबरोबर जाऊन चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. आपण सर्व जण एकत्र हसतो, भावनिक होतो. पण, आता असा अनुभव दुर्मीळ होत चालला आहे. चित्रपटगृहे त्यांच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. करोनाकाळात अमेरिकेत चित्रपट दाखविणारे एक हजार स्क्रीन कमी झाले. आजही ही संख्या कमी होत आहे. आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा भाग आपण गमावत आहोत.

– शॉन बेकर, दिग्दर्शक, ‘अनोरा’

निवड सदस्यांच्या अंतिम मतदानप्रक्रियेच्या काही दिवस आधी या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कन यांनी समाजमाध्यमांत पूर्वी केलेला अवमानजनक मजकूर नव्याने समोर आला. त्या वादामुळे चित्र बदलल्याचे बोलले जाते. या चित्रपटासाठी झोई साल्डाना यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीसाठी आणि कॅमिली आणि क्लेमण्ट डुकॉल या संगीतकार द्वयीला ‘एल माल’ गाण्यासाठीचा पुरस्कार मिळाले. कैरन कल्किन यांना ‘ए रियल पेन’ चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘फ्लो’ हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरला.

सोफिया गॅस्कोनच्या वर्णद्वेशी टीकेचे ऑस्करवर सावट

‘एमिलीया पॅरेझ’च्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. ‘एमिलीया’ला सर्वोत्तम परभाषिक चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेत्री अशा विविध १३ विभागांमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीसाठी झोई साल्डानाला आणि ‘एल माल’ या सर्वोत्तम मूळ गीताला मिळालेले पुरस्कार वगळता या चित्रपटाच्या हाती निराशा आली. ‘कान’, ‘गोल्डन ग्लोब’, ‘बाफ्टा’, ‘सेझर’, ‘एएफआय’, युरोपीय चित्रपट पुरस्कार सोहळा अशा विविध ठिकाणी पुरस्कार जिंकलेल्या ‘एमिलीया पॅरेझ’ला ऑस्करसाठी १३ विभागांमध्ये एकूण दोन पुरस्कार मिळाले. प्रत्यक्षात सर्वोत्तम अभिनेत्रीच्या स्पर्धेत असलेल्या कार्ला सोफिया गॅस्कोनने २०२० आणि २०२१मध्ये केलेल्या काही आक्षेपार्ह ट्विटमुळे वाद निर्माण झाला होता. अमेरिकेत श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने हत्या केलेल्या जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकावर तिने वर्णद्वेषी टीका केली होती. त्याविषयी तिने खुलासा केला. पण त्याचे सावट ऑस्करवर पडण्याची शक्यता खरी ठरली.

पहिल्यांदा मानांकन मिळालेले कलाकार ठरले सरस

‘द सबस्टन्स’ या चित्रपटासाठी गेल्या दोन महिन्यांत बहुतांश पुरस्कार पटकाविणाऱ्या डेमी मूर यांना ऑस्करने मात्र हुलकावणी दिली. ‘ब्रुटलिस्ट’ आणि ‘विकिड’ या दोन्ही चित्रपटांना दहा नामांकने होती. त्यांना अनुक्रमे तीन आणि दोन पुरस्कारांवर समाधान मानावे लागले. परभाषिक चित्रपटापासून ते अ‍ॅनिमेशन आणि संकलन या गटांमध्ये पहिल्यांदा मानांकन मिळालेले कलाकार सरस ठरले.

Share this story