भारत पाक तणावाच्या वातावरणात Operation Sindoor चित्रपटाची घोषणा; पोस्टर रिलीज

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईवर अखेर चित्रपट घोषीत

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Dhanshri Otari
  • Fri, 9 May 2025
  • 11:20 pm

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईवर अखेर चित्रपट घोषीत करण्यात आला असून त्याचे पोस्टरदेखील रिलीज झालं आहे. दोन दिवसांपूर्वी 'ऑपरेशन सिंदूर'वर चित्रपट बनवण्यासाठी स्पर्धा लागली होती नावाच्या पेटंटसाठी 15 निर्मात्यांमध्ये वाद झाल्याचीदेखील माहिती समोर आली होती. 

भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या या कारवाईवर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी अनेक स्टुडिओंमध्ये चढाओढ सुरू झाली. दरम्यान ऑपरेशन सिंदूर वर चित्रपट घोषित करण्यात आले असून त्याचे पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये, लष्कराचा गणवेश घातलेली एक महिला अत्यंत आत्मविश्वासाने कपाळावर सिंदूर लावताना दिसत आहे. वायरलबियानी या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली असून काही तासांनंतर ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. 

चित्रपटाचे हे पोस्टर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आले आहे. मात्र, युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी कौतुक केलं आहे तर काहींनी ट्रोल केले आहे. 

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या क्रूर घटनेनंतर भारत सरकारने तातडीने निर्णय घेत, 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. रात्रीच्या वेळी हवाई दलाच्या विशेष युनिटने 25 मिनिटांच्या काळात 24 अचूक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांच्या गुप्त तळांचा समावेश या कारवाईत होता. या ऑपरेशनमध्ये सुमारे 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 60 जण जखमी झाले आहेत.

Share this story