Entertainment News....
Entertainment News | साल २०२२ मध्ये आलेला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. चित्रपटाला मिळालेले य़श पाहुन ऋषभ शेट्टीने ‘कांतारा २’ ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा एक टीजरही समोर आला होता. या टीजर व्हिडीओला चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाचे वृत्त समोर येत आहे, ते म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील एका ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू झाला आहे.
केरळमधील एमएफ कपिल नावाच्या ज्युनिअर आर्टिस्टची मंगळवारी (दि.६ मे) दुपारी कोल्लूरमधील सौपर्णीका नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. जेवणाच्या सुट्टीनंतर तो नदीत पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेल्याचे वृत्त आहे. यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागासह तात्काळ शोध आणि बचाव कार्य सुरू केले. मग संध्याकाळी कपिलचा मृतदेह नदीतून सापडला.
याप्रकरणी कोल्लूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेसंदर्भात पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. या ज्युनिअर आर्टिस्टच्या अपघाती निधनामुळे चित्रपटातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे चित्रीकरणही थांबले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाच्या टीमसाठी ही घटना म्हणजे आणखी एक धक्का आहे. यापूर्वी कोल्लूरमध्ये काही कलाकारांना घेऊन जाणारी बस उलटली होती.
याव्यतिरिक्त, वारा आणि पावसामुळे मोठ्या खर्चाने बांधलेला एक भव्य सेटचेही नुकसान झाले होते. त्यानंतर चित्रीकरणादरम्यान नैसर्गिक अधिवासाला त्रास दिल्याच्या आरोपाखाली वन विभागाकडूनही टीमची चौकशी करण्यात आली. शिवाय निर्मात्यांना येणाऱ्या अडचणींमुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र यावर मग निर्मात्यांनी २ ऑक्टोबर ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. अशातच आता ही ज्युनिअर आर्टिस्टच्या मृत्यूची दु:खद घटना घडली आहे.