संग्रहित छायाचित्र
अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या 'द डिप्लोमॅट' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ‘‘अल्पसंख्याक असलो तरी मला देशात कधीच असुरक्षित वाटले नाही. भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे,’’ असे मत व्यक्त केले.
देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, या मुद्द्यावर जाॅनने आपले मत व्यक्त केले आहे. त्याला विचारण्यात आले की, ‘‘भारतात अल्पसंख्याक असल्याने तुला असुरक्षित वाटते का? या संपूर्ण चर्चेवर तुझे काय म्हणणे आहे?’’ जाॅनने हा दावा पूर्णपणे नाकारला. त्याने म्हटले की त्याला देशात कधीही असुरक्षित वाटले नाही. लोक तुम्हाला आवडू शकतात किंवा इतर कारणांमुळे नापसंत करू शकतात. पण मी अल्पसंख्याक आहे. माझी आई पारशी आहे. माझे वडील सीरियन ख्रिश्चन आहेत. आणि मला माझ्या देशात जितके सुरक्षित वाटते तितके सुरक्षित मला कुठेच वाटले नाही.’’
मला आपला देश आवडतो आणि मला येथे खूप सुरक्षित वाटते. कदाचित मी अशा अल्पसंख्याक समुदायातून आलो आहे ज्याच्याशी कोणालाही काही अडचण नाही. मला माहित नाही... पारशी लोकांशी कोणाला अडचण असेल? स्वतःबद्दल बोलायचे झाले तर, मला या देशात खूप सुरक्षित वाटते आणि भारतीय असण्याबद्दल मला खूप चांगले वाटते. मला असेही वाटते की कदाचित माझ्यापेक्षा जास्त भारतीय कोणी नसेल.
जाॅनचा 'द डिप्लोमॅट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तो राजनैतिक अधिकारी जितेंद्र पाल सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात पाकिस्तानात राहणाऱ्या उज्मा अहमद या भारतीय मुलीच्या सुटकेची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. उज्माच्या सुटकेत जेपी सिंग यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी जेपी सिंग पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात संयुक्त उच्चायुक्त म्हणून काम करत होते.