संग्रहित छायाचित्र
भाजप नेता आणि खासदार असलेली चर्चित अभिनेत्री कंगना रनोटचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही, परंतु नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे काही प्रमाणात कौतुक झाले. काहींनी तर हा चित्रपट इतका चांगला आहे की तो ऑस्करला पाठवला पाहिजे, इसे मत व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने अमेरिकेवर टीका केली आणि ऑस्कर हा मुर्खांचा पुरस्कार असल्याचे सुनावले.
चित्रपटाच्या अपयशामुळे निराश असलेल्या कंगनाला नेटफ्लिक्सवर मिळालेल्या माफक यशाने उभारी मिळाली. मात्र, याच्या नादात तिने थेट आॅस्कर पुरस्कारांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये 'इमर्जन्सी' चित्रपटाला मिळत असलेल्या कौतुकाचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘‘इमर्जन्सीने भारताच्या वतीने ऑस्कर जिंकला पाहिजे. काय भन्नाट चित्रपट आहे, टीम कंगना!’’
याला उत्तर देताना कंगनाने लिहिले आहे की, पण अमेरिकेला त्यांचा खरा चेहरा पाहायचा नाही, तो विकसनशील देशांना कसा धमकावतो, दडपतो आणि दबाव आणतो. ‘इमर्जन्सी’मुळे हे सर्व उघडकीस आले आहे. त्या मूर्ख ऑस्करला जपून ठेवा. आम्हाला आमच्या राष्ट्रीय पुरस्काराचे महत्व आहे.
चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांनीही ‘इमर्जन्सी’चे कौतुक केले. ‘‘आज मी कंगनाचा ‘इमर्जन्सी’ पाहिला. खरे सांगायचे तर, मी आधीच अंदाज लावला होता तसा हा चित्रपट वरवरचा नाही. मी चुकलो याचा मला खूप आनंद आहे. कंगनाचा अभिनय आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा चित्रपट जागतिक दर्जाचा आहे,’’ असे ते म्हणाले.
यावर कंगनाने म्हणते, ‘‘चित्रपट उद्योगाने द्वेषाच्या पलीकडे जाऊन गृहीतके न ठेवता चांगल्या कामाचे कौतुक करावे. हा अडथळा दूर केल्याबद्दल संजयजी, तुमचे आभार. चित्रपटसृष्टीतील लोकांना माझा संदेश आहे की माझ्याबद्दल कोणतेही गृहीत धरू नका. मला समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका, मी समजण्यापलीकडे आहे.’’
दीर्घ वादानंतर, 'इमर्जन्सी' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने मंजूर केला आणि १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. वाद आणि विरोधामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही आणि केवळ २२ कोटी रुपयांची कमाई करण्यापुरता मर्यादित राहिला. नंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, अनुपम खेर असे अनेक कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.