संग्रहीत छायाचित्र
मुंबई - चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांचा त्रास संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांना मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने चेक बाऊन्स प्रकरणी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सात वर्षांपासून ही केस सुरू होती. मात्र, राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. त्यांनी अलीकडेच त्यांच्या 'सिंडिकेट' या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. कोर्टाने सांगितले की, ‘‘या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी गैरहजर होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला ३ लाख ७२ हजार २१९ रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. तसे न केल्यास त्यांना आणखी तीन महिने कारावास भोगावा लागेल.
२०१८ मध्ये श्री नावाच्या कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ही बाब संचालकांच्या फर्म कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात, जून २०२२ मध्ये, वर्मा यांना न्यायालयाने पीआर आणि रोख पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कोविड-१९ दरम्यान आर्थिक संकटामुळे राम गोपाल वर्मा यांना त्यांचे कार्यालय विकावे लागले होते.