उत्सुकता दुसऱ्या ‘वाॅर’ची

हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर टू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो साऊथकडील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच हृतिकने चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Mon, 7 Apr 2025
  • 04:45 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर टू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो साऊथकडील सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलीकडेच हृतिकने चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. त्याने माहिती दिली की चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे आणि आता ज्युनियर एनटीआरसोबत फक्त एक गाणे चित्रित करायचे आहे. त्यामुळे बाॅलिवडू चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये ‘वाॅर टू’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जॉर्जियामध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हृतिक रोशन म्हणाला, ‘‘वॉर टू कसा असेल, याबद्दल मला भीती वाटत होती. पण आता मला या चित्रपटाचा अभिमान आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. फक्त एक गाणे शिल्लक आहे, ते ज्युनियर एनटीआरसोबत आहे, आणि मी आता तो शूट करणार आहे. मला आशा आहे की मी चांगले करू शकेन. ज्युनियर एनटीआर खूप छान आहे म्हणून मी थोडा घाबरलो आहे. पण हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा मोठा आणि चांगला असेल, याची खात्री मी देतो. सर्वांचे प्रेम हवे आहे. कृपया, माझ्या नशिबासाठी प्रार्थना करा.’’

यादरम्यान हृतिकने ज्युनियर एनटीआर हा आपला आवडता सहअभिनेता असल्याचेदेखील म्हटले. ‘‘मी त्याच्यासोबत ‘वॉर टू’च्या रुपात प्रथमच एकत्र काम केले. तो माझा आवडता सहकलाकार आहे, असे मी नक्कीच म्हणू शकतो. तो  खूपच अद्भुत आहेत. त्याच्यात दैवी उर्जा आहे, असे मला वाटते. मला वाटतं आम्ही सर्वांनी चांगलं काम केलं आहे. आता फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहोत,’’ असे हृतिक म्हणाला.

'वॉर टू' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी याचे दिग्दर्शन करत आहेत. आदित्य चोप्राच्या ‘वायआरएफ स्पाय युनिव्हर्स’ सिरीजमधील हा पुढचा भाग आहे. ‘एक था टायगर,’ ‘टायगर जिन्दा है,’ ‘वाॅर,’ ‘पठाण,’या ‘टायगर थ्री’ हे या सिरीजमधील पूर्वीचे चित्रपट होते. ‘वाॅर टू’ आणि ‘अल्फा’ हे ‘वायआरएफ स्पाय युनिव्हर्स’मधील आागमी चित्रपट आहेत.

‘वाॅर टू’ चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरव्यतिरिक्त कियारा अडवाणीदेखील दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन ‘वॉर’ चित्रपटातील त्याच्या मेजर कबीर धालीवाल या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०१९ च्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘वॉर टू’ चा सिक्वेल आहे. याचा पहिला भाग सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता.

Share this story