Chhaava : ‘छावा’ची डरकाळी ५०० कोटींपार

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विक्कीच्या 'छावा' चित्रपटाचे कौतुक केले होते

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 10 Mar 2025
  • 05:46 pm

विक्की कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

महत्वाचे म्हणजे, २०२५ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २३ दिवसांत ५०० कोटींचा आकडा गाठणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने जगभरात चित्रपटाने ६९१ कोटी रुपये कमावले.

सॅकॅनिल्कच्या मते, 'छावा' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने ५०३.३ कोटी रुपये कमावले. तर तेलुगू डब केलेल्या आवृत्तीने ५.५ कोटी रुपये कमावले.  चित्रपटाच्या २२ व्या दिवशी, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एका पोस्टद्वारे छावाचा नवीनतम कलेक्शन शेअर केला. त्यांच्या मते, शुक्रवारी म्हणजेच २२ व्या दिवशी चित्रपटाने ६.३० कोटी रुपये कमावले. त्यानंतर भारतात 'छावा'चे कलेक्शन ५०२.७० कोटी रुपयांवर पोहोचले.

यासह, 'छावा' हा चित्रपट भारतात ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या यादीमध्ये 'पुष्पा २' (हिंदी आवृत्ती), 'जवान,' 'स्त्री २,' 'गदर २,' ‘पठाण,’, 'बाहुबली २' (हिंदी आवृत्ती) आणि रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.  'छावा' हा चित्रपट ७ मार्च रोजी तेलुगू भाषेतही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.६३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

आता हळूहळू शाहरुख खानचा 'जवान-पठाण', श्रद्धा कपूर-राजकुमार रावचा 'स्त्री २' आणि रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' यांसारख्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडण्याकडे ‘छावा’ वाटचाल करत आहे.

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विक्कीच्या 'छावा' चित्रपटाचे कौतुक केले होते. नवी दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना पंतप्रधानांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘‘आजकाल छावा ट्रेंडमध्ये आहे.’’

'छावा' चित्रपटाबाबतही वाद निर्माण झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विक्की कौशल नाचताना दाखवण्यात आला होता. यामुळे अनेकांना राग आला. या मुद्द्यावर माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना लेझीम वाजवताना दाखवणे ठीक आहे, पण त्यांना नाचताना दाखवले आहे.

चित्रपट निर्मात्यांवर ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोपही करण्यात आला. ‘छावा’ चित्रपटात गणोजी आणि कान्होजी नावाच्या दोन पात्रांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. गणोजी आणि कान्होजी संभाजी महाराजांचा विश्वासघात करताना आणि औरंगजेबाशी हातमिळवणी करताना दाखवले आहेत. ज्यामुळे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांच्या वंशजांनी चित्रपटाला विरोध केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोटीस मिळाल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के कुटुंबातील वंशजांपैकी एक भूषण शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी माफी मागितली आणि सांगितले की आम्ही चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांची खूप काळजी घेतली आहे. गणोजी आणि कान्होजी यांचे आडनावेही सांगितलेली नाहीत.

दिग्दर्शक म्हणाले, ‘‘आमचा हेतू शिर्के कुटुंबाला दुखावण्याचा नव्हता. जर 'छावा' चित्रपटामुळे काही त्रास झाला असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.’’ 'छावा' चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे आणि रश्मिका मंदाना त्यांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीचे रूपांतर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि दिनेश विजन यांनी केली आहे. विक्की आणि रश्मिका व्यतिरिक्त, चित्रपटात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Share this story