अमिताभ बच्चन यांनी केले अल्लू अर्जुनचे कौतुक

बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अल्लू अर्जुन यांनी अलीकडेच ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या कामाचे कौतुक केले. अमिताभ यांनी अल्लू अर्जुनच्या कामाची आणि प्रतिभेची प्रशंसा केली

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Machale
  • Tue, 10 Dec 2024
  • 06:50 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अल्लू अर्जुन यांनी अलीकडेच ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी संवाद साधला. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या कामाचे कौतुक केले. अमिताभ यांनी अल्लू अर्जुनच्या कामाची आणि प्रतिभेची प्रशंसा केली, तर अल्लू अर्जुनने अमिताभ यांना आपले प्रेरणास्थान म्हटले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-2’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशादरम्यान अल्लू अर्जुनचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अभिनेत्याचा हा व्हिडिओ २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा-द राइज’च्या प्रमोशनच्या वेळचा आहे. या व्हीडीओमध्ये अल्लू अर्जुन अमिताभ यांचे कौतुक करताना दिसत आहे.

अमिताभ यांच्याबद्दल बोलताना अल्लू म्हणाला होता की, ‘‘मला अमिताभ यांच्याकडून सर्वात जास्त प्रेरणा मिळते. माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे. आपण सर्वजण त्यांचा अभिनय बघून मोठे झालो आहोत. आजही जेव्हा मी त्यांना अभिनय करताना पाहतो तेव्हा मी त्यांच्यासारखाच चमकदार अभिनय करू शकेन का, असा प्रश्न पडतो. म्हणूनच माझी इच्छा आहे की जर तुम्हाला वयाच्या ६०, ७० व्या वर्षी काम करायचे असेल तर तुम्ही अमिताभजींसारखे सुंदर काम करावे.’’

आता या व्हीडीओवर अमिताभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अल्लूचा जुना व्हीडीओ त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘‘तुमच्या या शब्दांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या लायकीपेक्षा जास्त प्रेम तुम्ही दिले आहे. आम्ही सर्व तुमच्या कामाचे आणि तुमच्या प्रतिभेचे मोठे चाहते आहोत. मला आशा आहे की तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहाल. तुमच्या यशासाठी माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत.’’

 अल्लूने अमिताभ यांच्या पोस्टला उत्तर देत त्यांचे आभार मानले. ‘‘तुम्हीर आमचे सुपरहिरो आहात. तुमच्याकडून असे शब्द ऐकणे ही मोठी गोष्ट आहे. तुमचे शब्द, प्रशंसा आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद,’’ अशा शब्दांत त्याने कृतज्ञता व्यक्त केली.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story