शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत केलेल्या गंभीर दाव्यानंतर आता पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मोठं भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या विधानावर ते ठाम आहेत आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे की, “मी खोटं बोलतोय हे दाखवा”.
रामदास कदम म्हणाले, “माझ्या सारखा मातोश्रीवर राहिलेला माणूस असं का बोलतो? याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं. मी आज उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, तुमच्यात हिंमत असेल तर बोला, मग मी उत्तर देईन. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. मी जेव्हा पुजेला बसतो, तेव्हा बाळासाहेब यांचं दर्शन घेतो. मात्र माझ्यासारख्या व्यक्तीला अशा प्रकारचं का बोलावं लागलं?”
त्यांनी उद्धव ठाकरेंवर कटू टीका करत म्हटले की, “दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची सवय उद्धव ठाकरे यांची आहे. दिसतात तसे नाहीत, ते कपटी आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या बॉडीचा दोन दिवस छळ झाला, हे मी पुन्हा जबाबदारीने सांगतो.”
रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, त्यांनी उद्धव ठाकरेंना आधीही सांगितले होते की शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा; तेव्हा उद्धव म्हणाले की, हातांचे ठसे घेतले आहेत. आता त्यांचा सवाल आहे की, “त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला?”
कदम यांनी महाराष्ट्राच्या जनतेसही स्पष्ट केले की, “दुसऱ्याची बोलण्याची पात्रता नाही. उद्धव ठाकरेंना हिंमत असेल तर थेट बोलावं, किंवा आमची नार्को टेस्ट करा, मी तयार आहे. बाळासाहेबांच्या निधनाबाबत मला माहिती देण्यास सांगण्यात आली होती, पण एवढ्या दिवसांपर्यंत मी बोललो नाही. मात्र, काल मी भाषण करताना ओघात ते बोलून गेलो.”


