संग्रहित छायाचित्र
आकांक्षा यादव: कुस्ती... एक कला, एक परंपरा, एक अस्मिता. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेली, पिढ्यान् पिढ्यांची जपलेली शौर्यपरंपरा. पण आज हीच परंपरा संकटात सापडली आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा होती, जी लाखो लोकांच्या हृदयात उत्साह आणि अभिमान निर्माण करायची. प्रत्येक गावात, प्रत्येक तालमीत घाम गाळणाऱ्या मल्लांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळायचं. मात्र आज महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा वाद आणि राजकारणाच्या विळख्यात अडकली आहे. दोन वर्षांपूर्वी सिकंदर शेख, मागच्या वर्षी दोन-दोन महाराष्ट्र केसरी विजेते आणि यंदा शिवराज राक्षे. तीन सलग वर्षे... आणि प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या मातीत या परंपरेला डाग लागला.
कधी कुणी या कुस्तिगीरांच्या संघर्षाचं गांभीर्य समजून घेतलं का? ज्या लाल मातीशी एकनिष्ठ राहून मल्लांनी आपली स्वप्ने विणली, त्या मातीच्या परंपरेचं काय? आजची महाराष्ट्र केसरी स्पर्धा, जिचं कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान आहे, तीच सत्तेच्या खेळांमध्ये आणि समाजाच्या चुकीच्या निर्णयांमध्ये भरडली जात आहे.
जर महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा राजकीय स्वार्थ आणि वादाच्या भोवऱ्यात अडकू लागल्या, तर त्या मातीसाठी झगडणाऱ्या मल्लांच्या स्वप्नांचं काय? त्यांच्या कुटुंबांनी केलेल्या त्यागाचं काय? कुस्तीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणाला आहे? राजकीय डावपेचांच्या आहारी जाऊन ही परंपरा नष्ट होऊ द्यायची का? घरदार सोडून लंगोट घालून झुंजणाऱ्या या मल्लांना आज वेगळ्याच दिशेने फेकलं जात आहे. त्यांच्या घामाचा, रक्ताचा, कष्टांचा असा अनादर का? लाखो लोकांच्या अपेक्षांची हेळसांड का केली जाते? याचा विचार कुणी केला आहे का?
पिढ्यान् पिढ्या संघर्ष करून उभी राहिलेली मल्लांची ही परंपरा, तिचा इतिहास, त्यातील अभिमान हे सगळं विसरून महाराष्ट्र केसरीला केवळ एक तमाशा बनवलं जातंय. हीच या मल्लांसाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी खरी शोकांतिका आहे. या अस्मितेचा, या शौर्यपरंपरेचा असा अपमान करून कुणाला फायदा होणार आहे? कुस्तीला राजकीय आखाडा बनवलं तर महाराष्ट्राला काय मिळेल? त्या तरुण मल्लांचं काय, जे आपल्या कष्टाच्या जोरावर मोठं होण्याची स्वप्नं पाहात आहेत? त्यांच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार?
जोपर्यंत महाराष्ट्र केसरी ही एक स्पर्धा होती, तोपर्यंत ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान होता, पण आता तीच परंपरा धोक्यात आली आहे. म्हणूनच आपल्याला एकत्र यायला हवं, ही परंपरा जपायला हवी. महाराष्ट्र केसरी ही केवळ एक स्पर्धा नाही, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दानी वारशाची जागतिक ओळख आहे.
या मातीत जन्मलेल्या कुस्तीच्या परंपरेचा अनादर होणे म्हणजे आपल्या अस्मितेचा अपमान होणे. कुस्तीला राजकारणाने गढूळ केलंय, हे उघड आहे. पण आता ही परंपरा वाचवायची जबाबदारी आपली आहे. नाहीतर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हे असंच चालू राहिलं,तर लवकरच म्हणावं लागेल – "एक होती महाराष्ट्र केसरी!"