सग्रहीत छायाचित्र
पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मटन पार्टी प्रकरणानंतर आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दोन आरोपींसोबत चक्क पोलिस कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने पुणे रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत चार पोलिस कर्मचाऱ्यांना दोन आरोपींसोबत पार्टी करताना रंगेहाथ पकडले. हे पोलिस कर्मचारी संबंधित आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात घेऊन आले होते. मात्र, कामकाज संपल्यानंतर आरोपींना थेट तुरुंगात न नेता ते हॉटेलमध्ये गेले आणि तिथे पार्टी सुरू झाली.
या प्रकाराची माहिती थेट नाशिक पोलीस आयुक्तांना मिळताच त्यांनी युनिट एकच्या विशेष पथकाला घटनास्थळी पाठवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला आणि पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपींसोबत अन्नविहार करताना पकडण्यात आले.
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे रात्री उशिरापर्यंत चौघा कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. आता या कर्मचाऱ्यांविरोधात काय शिस्तभंगाची किंवा गुन्हेगारी कारवाई केली जाईल, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.