‘एक है तो सेफ है’चा नारा; अदानींना समोर ठेऊन राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका, मुंबईत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दाखवली 'तिजोरी'
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान सोमवारी (दि. १८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘एक हैं तो सैफ है’ हा नारा मोदी यांनी त्यांचे उद्योगपती मित्र गौतम अदानी यांना नजरेसमोर ठेऊन दिल्याचा घणाघात त्यांनी केला.
मोदी, भाजप आणि केंद्र सरकार यांना यावेळी राहुल गांधी यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘एका अरबपतीला आणखी श्रीमंत बनवण्याचा मोदी यांचा विचार आहे. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आले आहे. सुमारे आठ मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगार वाढत आहे. महाराष्ट्रातील पाच लाख तरुणांचे रोजगार हिरावून घेतले. महाराष्ट्रातील उद्योग चोरी करण्याचे काम केले आहे.’’ अदानींनाच सर्व विमानतळ, धारावी दिली जात आहे. एवढेच नव्हे तर अदानींचा संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोपदेखील राहुल यांनी केला.
‘एक हे तो सेफ है’ या घोषणेवर टीका करताना राहुल यांनी तिजोरी दाखवली. या तिजोरीमधून त्यांनी एक चित्र बाहेर काढले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचा फोटो दाखवला. तसेच मुंबई येथील धारावीची जागा आणि त्याची ब्लूप्रिंट दाखवली. त्यांच्या ‘एक हे तो सेफ है’ या घोषणेचा अर्थ आम्ही तुम्हाला यातून दाखवत आहोत, असे ते म्हणाले.
भाजपला महत्त्वाच्या मुद्द्यावरून भरकटवण्याची सवय आहे. म्हणून ते धर्मयुद्ध वगैरे असे विषय काढत असल्याचा आरोप करून राहुल पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार यावर भाजप काही बोलू शकत नाही. म्हणून फक्त इतर विषय काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे करण्याचे काम भाजप करत असते.’’ आमचे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे असणार आहे. त्यामुळेच आम्ही सगळे एकत्र उभे आहोत. यावेळी महाविकास आघाडी सत्तेत येईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जनतेला महागाईचा जास्त त्रास होत आहे. आम्ही महिलांना बससेवा मोफत करणार, महिलांना तीन हजार रुपये प्रतिमहिना देणार. मोफत एमएसपी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, जातनिहाय जनगणना करण्याचा, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवण्याचा आमचा विचार आहे. याबद्दल आम्ही दिल्ली सरकारलादेखील बोललो होतो. आरोग्य विमादेखील २५ लाखांपर्यंत आमच,े सरकार देणार आहे. हे राजस्थानमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बेरोजगार युवकांना आम्ही चार हजार रुपये प्रतिमहिना देऊ, असे आश्वासन राहुल यांनी दिले.