संग्रहित छायाचित्र
मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी विविध प्रश्न विचारत राज्य सरकार तसेच गृह मंत्रालयाला घेरले आहे. प्रत्यक्ष उच्च न्यायालयानेही सुनावणीवेळी हे एन्काऊंटर असू शकत नाही अशी टिप्पणी केली होती. यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या टिप्पणीला काही अर्थ नाही, असे मत व्यक्त केले आहे.
अक्षय शिंदे चकमक प्रकरणी सरकार सतत कारवाईचे समर्थन करत असून फडणवीसही गेल्या दोन-तीन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. त्यात ते कारवाईचे समर्थन करत आहेत. काही दिवसांपूर्वी धारावीतील अवैध धार्मिक स्थळावरील बुलडोझर कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे महाराष्ट्रही आता उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर कारवाई आणि चकमकीच्या माध्यमातून आरोपींना ठोकण्याची प्रेरणा घेतली आहे का ? असा प्रश्न फडणवीस यांना वृत्तवाहिनीच्या मुलाखतीवेळी विचारला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई योग्यच होती. त्याने आधी पोलिसांवर गोळी झाडली. अशावेळी पोलीस त्याच्यासमोर हात जोडून शांततेचे आवाहन करू शकत नाही. त्याने गोळी चालवली म्हणून पोलिसांनाही स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडाव्या लागल्या. पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. या घटनेला फेक एन्काऊंटर म्हणणे चुकीचे आहे. या प्रकरणी सुनावणीवेळी उच्च न्यायालयासमोर परिस्थिती अजून आलेली नाही. न्यायालयाने काही टिप्पण्या केल्या आहेत. न्यायालयात जे सांगितले जाते, ते महत्त्वपूर्ण नसते. न्यायालयात काय लिहिले जाते, त्याला महत्त्व असते. न्यायालयाने लेखी आदेशात कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
बुलडोझर कारवाई आणि एन्काऊंटर प्रेरणा उत्तर प्रदेश सरकारकडून घेतली का? यावर ते म्हणाले, उत्तर प्रदेशकडून प्रेरणा घेण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. त्यांनी राम मंदिर बांधले, याची प्रेरणा घेऊ. एन्काऊंटरची प्रेरणा घ्यायची आम्हाला गरज नाही. एकेकाळी फक्त महाराष्ट्र विकास करण्यात आघाडीवर होता. आज उत्तर प्रदेश विकास करत आहे, याचा आनंद होतो. महाराष्ट्र सर्वांच्या पुढे गेलेले राज्य आहे. महाराष्ट्राला इतर राज्यांकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही.
भाजपामुळे आज राज्यात सहा पक्ष तयार झालेत का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीला उद्धव ठाकरे, शरद पवार जबाबदार आहेत. एक काळ असा होता की काँग्रेसचे लोक म्हणायचे की यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे. आत्ताही काही प्रमाणात हे बोललं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. आपल्या मुलाला, मुलीला पक्षाचा वारसा द्यायचा या महत्त्वाकांक्षेने त्यांचा घात केला.
शरद पवारांचा पक्ष आम्ही फोडू शकतो का? ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले, त्यांचा पक्ष भाजपा कशी काय फोडू शकते? शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. त्यांचा वारसा त्यांनी इतक्या वर्षांपासून अजित पवारांकडे दिला होता. आता त्यांना वाटलं की सुप्रिया सुळेंकडे वारसा असला पाहिजे. राजकारणात घराणेशाही असलेले पक्ष असतात त्यांची अवस्था अशीच होते. अजित पवारांना जेव्हा वाटलं की आता माझं राजकारणच संपेल, त्यावेळी ते आमच्याबरोबर आले. शिवसेनेत एकनाथ शिंदेंना जेव्हा हे जाणवलं की ज्या काही तडजोडी होत आहेत त्या आदित्य ठाकरेंसाठी चालल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्ष सोपवायचा आहे. एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करून आदित्य ठाकरेंचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शिवसेना फुटली. शिवसेना मोठी झाली हिंदुत्वामुळे, हिंदुत्व सोडल्यानंतर लोकांकडे जाऊन मते मागायची कशी, हा प्रश्न एकनाथ शिंदेंना पडला होता. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना फुटली. आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले तेव्हा आम्ही सरकार स्थापन केले.
२१ जून २०२२ ला शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यांना ४० आमदारांची साथ लाभली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडले. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडीचा प्रयोग अशाप्रकारे संपवल्यावर साधारण वर्षाने म्हणजेच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी महायुतीत येणं पसंत केलं. त्यांच्यासह ४१ आमदारही महायुतीत आले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोठा झटका बसला. आता या सगळ्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.