सग्रहीत छायाचित्र
सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीवर घेण्याची बातमी आली तेव्हा मी संजय राऊत यांची भेट घेतली होती. हा फार मोठा अन्याय आहे. ख्वाजा युनूस यांना मारण्याचा खटला अजूनही त्याच्यावर चालू आहे. असे असताना पुन्हा सेवेत घेणे चुकीचे आहे, असे मी त्यांना म्हणालो होतो. शरद पवार यांनीही वाझेला सेवेत घेणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र, तरीही थोड्या दिवसांनी वाझेला सेवेत घेण्यात आले, हा अट्टाहास शिवसेनेला महागात पडला असल्याचे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर राजकारणातील कटू प्रसंग टाळता आले असते, असे विधान नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. वाझेला पुन्हा सेवेत घेऊ नये, यासाठी आपण शरद पवारांना भेटलो होतो, असेही राऊत म्हणाले आहेत. यावर आता समाजवादीच्या अबू आझमी यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आझमी म्हणाले की, सचिन वाझेला सेवेत परत घेण्याचा अट्टाहास उद्धव ठाकरेंना महागात पडला आहे. त्यांनी गरज नसताना आणि नियमात बसत नसताना वाझेला संधी दिली. या वाझेची त्यांना अडचणीत आणले. तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी मला कॉल केला होता. वाझे यांना सेवेत घेऊ द्या, तुम्ही मध्ये येऊ नका, असे त्यांनी मला सांगितले. सोतबच ख्वाजा युनूस यांच्या आईला आम्ही मदत करू, असेही परमबीर सिंह म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हादेखील वाझेला सेवेत घेण्याविषयी विचार होत होता. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर तसा दबाव टाकायला सुरुवात केली होती. मात्र फडणवीसांनी दबाव झुगारत ही मागणी फेटाळून लावली. फडणवीसांच्या ठाम भूमिकेमुळे वाझेला पुन्हा नोकरीवर घेण्यात आले नाही, असा गौप्यस्फोट अबू आझमी यांनी केला.
राऊत काय म्हणाले होते?
संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला. पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार ते सेवेत येऊ शकत नव्हते. सचिन वाझेला मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. त्याला पुन्हा सेवेत घेऊ नये असे माझे मत आहे. सचिन वाझे पुन्हा नोकरीत येऊ नये किंवा त्याला घेतले जाऊ नये, यासाठी मी स्वत: शरद पवार यांना भेटलो होतो. पण तोपर्यंत बरेचसे निर्णय झाले होते.