संग्रहित छायाचित्र
नाशिक : मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच त्यांना काही लोकांकडून टार्गेट केले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याशिवाय महायुतीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी करण्यात काहीही गैर नसल्याचेही भुजबळ म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे. २८८ जागांपैकी २३९ जागा या महायुतीला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार यात काही गैर नाही कारण त्यांच्या १३२ जागा निवडून आल्या असल्याचे भुजबळ म्हणाले आहेत. त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन, असे सांगितले होते. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाहीत. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. शक्ती मागे उभी केली. त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत. याचे कारण तेच आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ईव्हीएमवर संशय घेणे चुकीचे
ईव्हीएम मशिनवर तुम्ही संशय घेत आहात. मला एक सांगा मला २०१९ मध्ये माझे मताधिक्क्य ५६ ते ५७ हजारांवर गेले होते. ते कमी होऊन २६ किंवा २७ हजारांवर आले आहे. मनोज जरांगे वगैरे मंडळी माझ्या मतदारसंघात मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री दोनपर्यंत फिरत होती. जर ईव्हीएमचा घोळ असता तर माझे मताधिक्य एक लाखाच्या पुढे गेले असते, असेही भुजबळ म्हणाले आहेत.