संग्रहित छायाचित्र
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. प्रचारात सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाळला जात नसल्याबद्दल उबाठा गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा देऊनही जिल्ह्यातील काँग्रेस आघाडी धर्म पाळत नसल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांवर उबाठाकडून बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेस आमचे ठरलेय याच आविर्भावात असल्याचे दिसत आहे. विशेषतः अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना काँग्रेसकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. उबाठा आणि काँग्रेसमधील संबंध ताणले आहेत. सोलापुरात महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेला आहे. ठाकरे शिवसेना गटाने काँग्रेससह ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचा निषेध केला आहे. सोलापूरमध्ये माकपचे उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर झालेली दगडफेक यातून आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले असताना ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. पक्षाचे सह संपर्कप्रमुख माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी ही घोषणा केली आहे.
सोलापूर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपापासूनच मतभेदांना सुरुवात झाली. जागावाटप झाल्यानंतर या मतभेदाने वादाचे रूप धारण केले. बहुतांश मतदारसंघात अधिकृत उमेदवारांविरुद्ध आघाडीतीलच अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीनंतर हे पक्ष आघाडीचा प्रचार करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बंडखोराच्या प्रचारातच गुंतले आहेत. हा सर्व प्रकार वाढत गेल्यावर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला आघाडी धर्माची आठवण करून दिली आणि तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिला. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभेत कानउघडणीही केली परंतु हे सर्व झाल्यावरही सोलापुरात काँग्रेस पक्ष त्यांच्याच बंडखोराच्या प्रचारात सहभागी होत असल्यास आघाडी धर्माला तिलांजली दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे शिवसेनेतून उद्धव ठाकरे संताप व्यक्त होऊ लागला होता. याची परिणीती ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असून तेथे या पक्षाचे अमर रतिकांत पाटील हे उभे आहेत. मात्र काँग्रेसकडून अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष धर्मराज काडादी यांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांवर शिवसेनेने बहिष्कार घातला आहे.