अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी शिंदेंच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विकास जाधव असं त्यांचे नावं असून 2020 मध्ये घडलेल्या प्रकरणावर उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असलेला विकास जाधव यांने 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवलं होते. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. माझा नाद सोड नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला खतम करतो. अशी धमकी देऊन पीडित मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकणी लातुर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम.कदम यांनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचा लातूर जिल्हा उपप्रमुख असून तो लातूर जिल्हा डीपीडीसी समितीवर मागील काळी सदस्यही होता.
पीडित मुलीने आत्महत्या केल्यानंतर वाढवणा पोलीस ठाण्यामध्ये 3 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय दंड संहिता कलम 376, 506 आणि 366 या अंतर्गत पोस्कोचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली होती.
मात्र काही दिवसांत विकास जाधव जामिनावर सुटून बाहेर आला. मयत मुलीच्या वडिलांनी प्रकरण कोर्टात नेलं आणि त्याचा पाठपुरावा केला. 21 ऑक्टोबर 2020 रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यानंतर 2022 साली आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली.
सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. त्यानुसार पीडित मुलीच्या मृत्यू प्रकरणी विकास जाधव याला दोषी ठरवण्यात आले. त्यासाठी दहा वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगण्याचे निकाल पत्रकात उल्लेख आहे.