संग्रहित छायाचित्र
बांधकामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित प्रदूषण मापक यंत्रणा बसवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्ल्यानंतर, एप्रिल-२०२५ च्या अखेरीस महापालिकेने ही यंत्रणा बसवण्यासाठी १५ कंपन्यांची निवड केली आहे. यंत्रणेसह कंपन्यांच्या निवडीला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही मंजुरी दिली आहे. या यंत्रणेमुळे बांधकामाठिकाणी प्रदूषण पातळी मोजता येणार आहे. महापालिकेला १२ जूनला यासंदर्भात न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी धडपड करावी लागणार आहे.
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. २०२२ पासून मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली होती. त्यामुळे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई महापालिकेने ऑक्टोबर २०२३ मध्येही एक परिपत्रक जारी करून मुंबईतील बांधकामस्थळांवर प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी २८ मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली. त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरोधात कारवाईचाही बडगा उचलला. मात्र, मोठ्या प्रमाणात बांधकामे पाहता धूळ प्रदूषण कमी होताना दिसत नाही. पावसाळा सोडल्यास उर्वरित महिन्यांत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यासंदर्भात, एप्रिल २०२५च्या अखेरीस उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. सर्व बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण पातळी मोजणारी प्रदूषण मापक यंत्रणा सहा आठवड्यांत बसवण्याचे आदेश दिले आहेत. १२ जूनपर्यंत यासंदर्भात अहवालही मुंबई महापालिकेला न्यायालयात सादर करावा लागणार आहे.
त्यामुळे महापालिकेने सेन्सरवर आधारित प्रदूषण मापक यंत्रणा डिस्प्लेसह बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही यंत्रणा विकसक, कंत्राटदारांनाच खरेदी करून बसवावी लागणार असून, त्यासाठी यंत्रणा उपलब्ध करणाऱ्या कंपन्या मात्र महापालिकेकडून देण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ कंपन्याही निवडण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. या कंपन्यांकडून यंत्रणा घेण्याची सूचना विकसक, कंत्राटदारांना असेल. मात्र, प्रदूषण मापक यंत्रणा स्वतः खरेदी करायची असल्यास विकसक, कंत्राटदारांना महापालिकेकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. ती यंत्रणा व्यवस्थित असल्याची तपासणीही महापालिका करणार आहे. मुंबईतील अडीच हजारांपेक्षा जास्त बांधकामांठिकाणी ही नवीन यंत्रणा महापालिकेच्या देखरेखीखाली बसवावी लागणार आहे. यात पालिकेचेही रस्ते, पूल विभागाबरोबरच मेट्रो आदींचा समावेश आहे.
एमएमआरडीए, म्हाडा, एसआरएला देणार पत्र
धूळ प्रदूषण होणाऱ्या कामाच्या ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा बसवणे विकसक आणि विविध कामांशी संबंधित कंत्राटदारांना बसवणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए यांचीही कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे ही यंत्रणा बसवण्यासाठी या प्राधिकरणांनाही पत्र दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १२ जूनच्या आधी मुंबईतील बहुतांशी ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा बसवणे बंधनकारक असेल. त्याची पुर्तता न केल्यास बांधकाम थांबवण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे यंत्रणा न बसवल्यास बांधकाम थांबवण्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.