शाळा प्रवेशोत्सव २०२५ | शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Swapnil Hajare
  • Mon, 16 Jun 2025
  • 03:03 pm
Maharashtra news,Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune,

विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करताना..

पुणे : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  (दि.१६) शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.

आज शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शिक्षकानेही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीने अध्यापन केले केले पाहिजे.

राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा  प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यादरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.  यावेळी आलेगावचे पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ आदी उपस्थित होते.

Share this story

Latest