मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (२० मार्च २०२६) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा निर्णय घेताना त्यांनी स्वतःवर झालेले आरोप फेटाळले असून, आपला त्या वादग्रस्त प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा करत लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या सगळ्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्याचं स्वागत करतानाच त्यांनी पुढील कारवाईची इशाराही दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, हा केवळ सुरुवात असून अजून काही मोठी नावे समोर येऊ शकतात. त्यांनी केवळ राजीनामा नको, तर चाकणकरांना पदावरून कायमचे बडतर्फ करावे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
पुढे नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेला राजीनामा आणि त्यावेळच्या त्यांच्या वागणुकीवरून दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “राजीनामा देताना रुपाली चाकणकर ज्या पद्धतीने उभ्या होत्या, तो प्रकार एखाद्या मॉडेलिंगच्या फोटोशूटसारखा वाटत होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप होता, ना विनम्रता; उलट सत्तेचा प्रचंड अहंकारच त्यातून झळकत होता,” अशा शब्दांत दमानिया यांनी चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
यावेळी बोलताना दमानिया यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात इतके गंभीर प्रकरण गाजत असताना, एका स्त्री म्हणून त्यांनी तातडीने पाऊल उचलणे अपेक्षित होते, असे दमानिया म्हणाल्या. “महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र जेव्हा या प्रकरणाने कळस गाठला आणि सर्व बाजूंनी दबाव वाढला, तेव्हाच त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. राजीनामा स्वीकारताना सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत होते, पण चाकणकरांची वृत्ती मात्र आत्मपरीक्षण करण्याऐवजी स्वतःचे प्रदर्शन करण्याकडेच अधिक होती,” असे निरीक्षण दमानिया यांनी नोंदवले.
रुपाली चाकणकर यांच्या राजकीय स्थानावरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चाकणकर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांना केवळ आयोगावरूनच नाही, तर या राजकीय जबाबदारीतूनही तातडीने मुक्त केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.


