परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. सध्या सर्वत्र धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Sep 2024
  • 10:55 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. सध्या सर्वत्र धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे.

हवामान खात्याकडून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या मंगळवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून आता मान्सून गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.  सध्या वसई-विरारमध्ये पावसाची संततधार सुरू आहे.

रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. वसई-विरार परिसरात आभाळ पूर्णतः भरून आले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. सध्या विरार ते चर्चगेट लोकल सेवा आणि शहरातील वाहतूक सुरळीत आहे. तर पालघरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुटला आहे. त्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात असलेल्या घाटीम परिसरामध्ये चार घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. तर काही घरांमध्ये पाणी साचले आहे. पालघरमध्ये परतीच्या पावसामध्ये मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

सोलापुराला ‘येलो अलर्ट’

सोलापूर शहर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. सोलापूर जिल्ह्याला सोमवारी (दि. २४)  आणि उद्याही ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. साधारण पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सोलापुरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर शहर आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, तर अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अहमदनगर शहराच्या बाजूने वाहात असलेल्या सीना नदीला पूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे नगर – कल्याण महामार्गावर पूल पाण्याखाली गेला आहे. नगर कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest